जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांचे प्रतिपादन : स्वच्छता बाळगण्याचे केले आवाहन
बेळगाव : जीबी सिंड्रोमबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाच्या विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी वरील आवाहन केले आहे. शुक्रवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात ही बैठक झाली. जीबी सिंड्रोमची लक्षणे दिसून आल्यास त्वरित उपचार घ्यावेत. हातापायांना मुंग्या येणे, बोलताना किंवा जेवताना त्रास होणे, रक्तदाबातील चढउतार, हृदयाचे ठोके वाढणे व श्वसनाचा त्रास जाणवणे आदी लक्षणे दिसून येतात.
नसांसंबंधी हा आजार असून काही वेळा लकव्याचाही धोका असतो. अशाप्रसंगी कोणीही घाबरण्याची गरज नाही. वेळेत उपचार घेण्याची गरज आहे, असेही राहुल शिंदे यांनी सांगितले. वेळेत उपचार घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होतो. प्लाझ्मासह विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. स्वच्छ व सुरक्षित पाणी व आरोग्याला पोषक असा आहार घ्यावा, जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर हातपाय धुवून घ्यावेत, स्वच्छतेवर भर द्यावा, याविषयी भीती वाढेल, अशी माहिती कोणी पसरवू नये, आरोग्य खात्याकडून जीबी सिंड्रोमबद्दल माहिती देण्यात येत असून लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत ग्राम पंचायत पातळीवर तपासून ते पिण्यायोग्य आहे का? यासंबंधी अहवाल देण्याची सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पंचायतीचे उपसचिव बसवराज आडवीमठ, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, अप्पर जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. एस. गडेद, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदनी देवडी, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रणाधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, डॉ. विवेक होन्नळ्ळी, डॉ. संजय दोडमनी आदींसह आरोग्य खात्यातील इतर अधिकारी उपस्थित होते.









