बेकायदेशीर मसाज पार्लरवर कारवाई करावी : कळंगूट चालस्टन रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाचे प्रारंभ
प्रतिनिधी /म्हापसा
येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धर्मांतर कायदा आणला जाईल असे म्हटले तरी आपण त्यांच्या मताशी सहमत नाही. राज्यात अशा घटना क्वचित घडतात व त्यासाठी पोलीस कायदा आहे. कोणा व्यक्तीवर धर्मांतर करण्यास जबरदस्ती करत असल्यास त्यांच्यावर तक्रार दाखल करून घेऊ द्या. कोणी अडविणार नाही, विधानसभेत हा कायदा आणण्याची गरज नाही. इतर राज्याप्रमाणे गोव्यात तशी घटना घडत नाही, राज्यात धर्मांतर विरोधी कायद्याची गरज नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी पर्रा येथे दिली.
कळंगूट चालस्टन रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा प्रारंभ केल्यावर विरोधी पक्ष नेते लोबो बोलत होते. यावेळी सरपंच शॉन मार्टीन्स, पंच पूजा मठकर, नितीन मठकर, दिनेश सिमेपुरुषकर, चंद्रकांत चोडणकर, शॅरल लोबो, इशीका हळदणकर, समीर कळंगुटकर आदी उपस्थित होते.
धर्मांतरामुळे दोन धर्मांमध्ये फुट
बेकायदेशीर धर्मांतरास आम्ही कधीच पाठिंबा देत नाही. यात ख्रिश्चन बांधवाचे नाव खराब होते. कुठल्याच कपेलमध्ये असे होत नाही. मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू सर्वजण सांगणार राज्यात धर्मांतर होत नाही म्हणून. धर्मांतर करणे चुकीचे आहे. गरीबांना गरजेसाठी रेशन, पैसे देणे व नंतर तुमच्या धर्मात आणणे अत्यंत चुकीचे आहे, असे मायकल लोबो म्हणाले.
कळंगूट, म्हापशातील बेकायदेशीर मसाज पार्लर बंद करा
चंदगडमधील पर्यटकांना म्हापशात लुटण्यात आले, अशा घटना यापूर्वीही कळंगुटमध्ये घडल्या आहेत. त्या आपण पोलिसांच्या नजरेस आणून दिल्या आहेत. काही क्लबचे दलाल स्वायपींग मशीन बरोबर घेऊन फिरतात. तुम्हाला येथे मसाज मिळणार, तेथे असे मिळणार असे सांगून आगावू पैसे मशीनद्वारे काढून घेतात व आतमध्ये नेऊन त्यांना काहीच देत नाही. आपण याबाबत पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांशी बैठक घेणार आहे. जे मसाज पार्लरच्या नावाखाली पर्यटकांना फसवितात अशांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. ही कृत्ये बंद व्हायला पाहिजे, असे मायकल लोबो पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आरोग्य खाते, पंचायतीने याकडे लक्ष द्यावे व बेकायदेशीर गैरकृत्य करणारे मसाज पार्लर सिलबंद करावा, अशी मागणी लोबो यांनी केली.
रस्त्याच्या बाजूच्या गाडय़ा पंचायतीने उचलाव्यात
कळंगूट चार्लस्टन रस्त्याचे हॉटमक्सि डांबरीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. हे काम करण्यास आठ महिने लागले. हडफडे ते सिम रस्ता हॉटमिक्स केला. गटार, भूमिगत केबल सर्व घातले आहे. रस्त्याच्या कामाच्या निविदा 5 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. जलस्त्रोत्र, पीडब्ल्यूडीने कामे हाती घेतली आहे. हॉटमिक्स करताना सर्व गाडय़ा बाजूला कराव्यात. जे उचलत नाही त्या गाडय़ा पंचायतीने उचलाव्यात. लोकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार लोबो यांनी केले.
पाच आमदार भाजपात जाणार ही अफवाच
पाच आमदार भाजपात येणार ही फक्त अफवा आणि आपापसातील बातमी आहे. तसे काही नाही. अशा बातम्या मुद्दामहून पसरविल्या जातात. तुम्हाला माहीत आहे ते कोण आहे तर आपण त्यांच्याशी बोलण्यास तयार आहे. सध्या तसे काही नाही, अशी माहिती विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी दिली.









