दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
पणजी : गोवा समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत नोकरी करणारे शिक्षक कमी वेतनावर काम करीत असून त्यांना वेतनवाढीचे आश्वासन देण्यात आले. परंतु त्याची पूर्तता न झाल्याने त्यांनी नाराजी वर्तवली आहे. केंद्र सरकारच्या वरील योजनेतून त्यांची भरती करण्यात आली होती. ते गेल्या 10 वर्षापासून कार्यरत असून उच्चशिक्षित आहेत. दोन वर्षापूर्वी म्हणजे 2021 साली या शिक्षकांनी आझाद मैदानावर संपानंतर निदर्शने केली होती. तेव्हा त्यांचे वेतन वाढवून रु. 25000 प्रति महिना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्या आश्वासनानंतर त्यांनी संप मागे घेतला होता. परंतु त्यानंतर आता 2 वर्षे होत आली तरी त्यांना वेतनवाढ मिळालेली नाही. शिवाय ते शिक्षक रु. 15000 प्रती महिना या अल्प वेतनावर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
‘कंत्राटी शिक्षक’ नामकरण
कला, शारीरिक व कार्य इत्यादी क्षेत्रासाठी शिक्षण खात्याने त्यांची भरती समग्र शिक्षा अभियानातून केली होती. समान काम, समान वेतन अशी त्यांची मागणी असून अर्धवेळ शिक्षक न म्हणता कंत्राटी शिक्षक असे नामकरण करावे अशी सूचना त्यांनी केली होती. ती सरकारने मान्य केली होती.
पाच टक्के वेतनवाढीचे आश्वासन
तसेच 10 महिन्यांचे कंत्राट 12 महिन्यांपर्यंत वाढवून 5 टक्के वेतनवाढ देण्याचे सरकारने मान्य केले हेते. तरंतु अजूनपर्यंत काहीच झाले नाही. कंत्राट वाढीसाठी भीक मागावी लागते, अशी व्यथा त्या शिक्षकांनी मांडली आहे.









