बनावट सोने तारण ठेवून मोठ्या रकमा उचलण्याचा फंडा, शहर परिसरात सोनेरी टोळी कार्यरत : प्रत्येकाने सावध राहण्याची गरज
बेळगाव : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत बँका, सोसायट्यांना ठकविणाऱ्या सोनेरी टोळ्या बेळगाव शहर व उपनगरात कार्यरत आहेत. या टोळ्यांनी अनेक आर्थिक संस्थात शुद्धता कमी असलेले दागिने तारण ठेवून कर्ज उचलले असून यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सोने आणि सोन्याचे दागिने हा विषयच नेहमी चर्चेचा असतो. सोन्याच्या नावाने फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. जमीन खोदाई करताना गुप्तधन मिळाले आहे, कमी किमतीत ते देण्याची तयारी दर्शवत सावजाला ठकवण्याचे अनेक प्रकार बेळगाव परिसरात घडले आहेत. यामध्ये राजस्थानमधील अलवर परिसरातील टोळ्यांचा मोठा वाटा आहे. कारवार, चिक्कमंगळूर, दावणगेरे परिसरातही स्वस्तात सोन्याचे नाणे देण्याचे सांगून अनेकांची फसवणूक केल्याची उदाहरणे आहेत. सुरुवातीला एक-दोन ग्रॅमचे खरे नाणे देऊन नंतर पितळी नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपयांना गंडविले जाते. अनेकवेळा खरेदी करण्यासाठी गेलेल्यांवर हल्लाही होतो. बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज परिसरातील अनेक जण या टोळीच्या नादी लागून फशी पडले आहेत. मध्यंतरी एका मोठ्या सराफी व्यावसायिकाने आपल्या पेढीतील दागिने स्वस्तात विक्रीस काढले आहेत, असे सांगत महिलांना फसवणाऱ्या एका ठकसेन महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला आहे. बेळगाव परिसरात गुप्तधन, सोन्याची नाणी, स्वस्तात दागिने देण्याच्या नावे फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत.
बेळगावात टोळीचा वावर
नामवंत बँका व सोसायट्यांमध्ये तारण ठेवलेले दागिने गायब झाल्याचीही उदाहरणे आहेत. सध्या बेळगाव परिसरात वेगळाच फंडा सुरू आहे. बनावट किंवा कमी दर्जाचे दागिने तारण ठेवून मोठी रक्कम कर्ज स्वरुपात उचलणाऱ्या टोळीचा वावर वाढला आहे. अनेक आर्थिक संस्थांना या टोळीतील गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली आहे. काही जण या टोळीच्या कारवायांमुळे फसले आहेत. तर काही जण चालाखीने बचावले आहेत. एखाद्या आर्थिक संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मैत्री करून दोन महिला व त्यांचे साथीदार त्या संस्थेत प्रवेश करतात. लहान कर्ज उचलण्यासाठी खरे दागिने तारण ठेवलेले असतात. संस्थाचालकांचा विश्वास संपादन केल्यानंतर कमी शुद्धतेचे दागिने ठेवून मोठी रक्कम उचलली जाते. प्रत्येक आर्थिक संस्थेत सोने तारण कर्ज देताना सोन्याचा कस तपासला जातो. कस तपासताना त्यांच्या डोळ्यात धूळफेक करून प्रसंगी त्यांची दिशाभूल करून कर्ज मिळविले जाते.
टोळीचे कारनामे जोरात सुरू
एकदा कर्ज मिळाले तर या सोनेरी टोळीतील गुन्हेगार चुकूनही त्या संस्थेकडे फिरकत नाहीत. या सोनेरी टोळीविरुद्ध आजवर एकही गुन्हा दाखल झाला नाही. कारण कर्ज उचलण्यासाठी त्यांनी ठेवलेले दागिने बनावट किंवा कमी शुद्धतेचे आहेत, हे उघडकीस आल्यानंतरच आपण फशी पडलो, हे आर्थिक संस्थांच्या लक्षात येणार आहे. सध्या तरी या टोळीचे कारनामे जोरात सुरू आहेत.
गुन्हेगाराकडून प्रतिष्ठितांच्या नावाचा वापर
आपण फसलो गेलो, हे ज्यांच्या लक्षात आले, ते या व्यवहारातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. या व्यवहारासाठी सोनेरी टोळीतील गुन्हेगार प्रतिष्ठितांच्या नावाचा वापर करतात. प्रसंगी त्यांना सोबत घेऊन आर्थिक संस्थेत जातात. ‘यांची जबाबदारी आम्ही घेतो’, असे दिलासा देऊन संस्थेचा विश्वास संपादन केला जातो. मात्र, कर्ज उचलण्यासाठी तारण ठेवले जाणारे दागिने बनावट किंवा कमी शुद्धतेचे आहेत, याची जाणीव मध्यस्थाला नसते. त्यामुळे त्यांचीही बदनामी होते. बेळगाव परिसरात अनेक आर्थिक संस्थातून या टोळीने कर्ज उचलले आहे. त्यांनी ठेवलेले दागिने बनावट आहेत, हे लक्षात आल्यानंतरच संचालकांचे डोळे उघडणार आहेत. कोणतीही सोसायटी असो किंवा बँक, सोने तारण कर्ज देताना जास्तीत जास्त खबरदारी घेतली जाते. तरीही त्या संस्थांच्या कडक तपासणीतून पळवाट ही शोधली जातेच. सोने तपासणाऱ्या आर्थिक संस्थेच्या कर्मचाऱ्याला भुलवण्यासाठी दिसण्यात बऱ्या असणाऱ्या ललनांचा वापर केला जातो. त्या कर्मचाऱ्याशी त्या महिला अत्यंत लाघवी भाषेत संवाद साधतात आणि आपला कार्यभार उरकतात.
सुशिक्षितांनाही मोह
सोन्याचा मोह प्रत्येकाला असतोच. यातही जर स्वस्तात सोने मिळत असेल तर कोणाला नको असते? स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या निमित्ताने अनेक सुशिक्षित फशी पडले आहेत. मध्यंतरी एका ऊसतोडणी टोळीतील कामगारांनी काही डॉक्टरांना गंडविल्याच्या घटना घडल्या होत्या. उपचारांच्या बदल्यात आमच्याजवळ पैसे नाहीत, सोन्याचे नाणे घ्या, असे सांगत विश्वास संपादन करायचे. आमच्याकडे अशी नाणी खूप आहेत. स्वस्तात खरेदी करा, असे आमिष दाखवत सुशिक्षितांना ठकविल्याची उदाहरणे आहेत. आता आर्थिक संस्थांना गंडविण्यासाठी बनावट आणि कमी शुद्धतेच्या दागिन्यांचा वापर केला जात असून वेळीच खबरदारी घेतली नाही तर फसवणूक ही अटळ आहे.









