आतिशी यांचा दावा : न्यायालयाच्या टिप्पणीचा दाखला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील अबकारी घोटाळ्याप्रकरणी आप नेते मनीष सिसोदिया हे 26 मार्चपासून तुरुंगात आहेत. 6 महिन्यांपासून ईडी आणि सीबीआय अबकारी घोटाळ्याप्रकरणी तपास करत आहेत. मद्य उद्योजकांकडून 100 कोटी रुपये घेण्यात आल्याचा दावा आरोप आहे. याप्रकरणी आरोपी असलेले राजेश जोशी आणि गौतम मल्होत्रा यांना न्यायालयाने शनिवारी जामीन दिला आहे. या जामीन आदेशातून या प्रकरणी एक पैशाचाही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केला आहे.
ईडीने प्रथम 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर ईडीने घोटाळ्याची व्याप्ती 30 कोटीची असल्याचे म्हटले होते. राजेश जोशीने ही रक्कम गोव्यात पोहोचविल्याचा आरोप आहे. परंतु याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. रक्कम हवालाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले, परंतु याचा कुठलाच पुरावा ईडीकडे नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.
भाजपने माफी मागावी
100 कोटी रुपये गोव्यातील निवडणुकीसाठी खर्च करण्यात आल्याचा आरोप असून ईडीने चौकशी पूर्ण केली आहे. परंतु पूर्ण चौकशीत गोव्यातील निवडणुकीत पक्षाकडून केवळ 19 लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. यामुळे भाजपने माफी मागावी अशी मागणी आतिशी यांनी केली आहे. मनीष सिसोदिया यांनी 14 फोन तोडल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु यातील 7 फाने ईडी अन् सीबीआयकडे असल्याचे आढळून आले आहे. न्यायालयाच्या टिप्पणीनंतर कुठलाच घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट असल्याचे आतिशी म्हणाल्या.
केजरीवालांचीही चौकशी
अबकारी घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यासमवेत अनेक जण तुरुंगात आहेत. तपास यंत्रणेने मागील महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलाविले होते. अबकारी धोरणात दुरुस्ती करताना अनेक अनियमितता करण्यात आल्या, परवानाधारकांना अवैध मार्गाने लाभ मिळवून देण्यात आले, परवाना शुल्क कमी करण्यात आल्याचा आरोप ईडी अन् सीबीआयकडून करण्यात आला आहे.









