कोल्हापूर :
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरील एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी यासाठी मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. बुधवारी याबाबत दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते. गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्त्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून जुनी वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते. मात्र कुत्र्याची समाधी ही 1936 साली उभारण्यात आली आहे. त्यामुळे तिला 100 वर्षे पूर्ण होण्याआधी काढणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात संभाजीराजे यांनी म्हटले आहे, वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याच्याबद्दल जी दंतकथा सांगितली जाते की त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केले. त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. पुण्यातील काही मंडळीनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. ते काम 1926 साली पूर्ण झाले. पण हा कुत्र्याचा पुतळा त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 1936 साली तिथे बसविला गेला. राजसंन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारला आहे. हे तेच नाटक आहे ज्या नाटकाने सगळ्यात पहिला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली. त्यांच्या चारित्र्यावर डाग लावले गेले. अशा नाटकाचा आज काही जणांना त्या कुत्र्यासाठी पुळका आलेला आहे. मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का ? छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक कुत्री असतील याबाबत काही शंका नाही. महाराजांकडे कुत्राच नव्हता असे आम्ही म्हणत नाही. कुत्रा हा प्राणी मनुष्याचा हजारो वर्षांपासून मित्र आहे. महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्री पाळली असतील. पण म्हणून थेट त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करायचा, आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच ! हे अयोग्य आहे.. स्वराज्यासाठी हजारो, लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या समाध्या आज कुठे नाहीत. आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभारणे हे योग्य आहे का ? हा महाराजांचा आणि त्या हजारो लाखो मावळ्यांचा अपमान नाही का ? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
- विनाकारण जातीय रंग नको
विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे नकळत एकप्रकारे तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी होत आहे. छत्रपती घराणे आणि होळकर घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचे लग्न याच तुकोजीराव होळकरांच्या मुलाशी लावून दिलेले होते. हा पहिला आंतरजातीय विवाह होता. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी होळकरांचे सध्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता. आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्यांव्यतिरिक्त कुणाचाही विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही. फक्त श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह झालेला आहे. इतके छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे होळकरांना विरोध म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे, असे म्हणून जे लोक धनगर बांधवांच्या भावना पेटवू पाहत आहेत त्यांचा उद्देश सफल होणार नाही, असे संभाजीराजेंनी नमूद केले.
- कुत्र्याने चितेत उडी घेतल्याची केवळ दंतकथाच
शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना महाराजांच्या रक्षा मिळाल्या होत्या. त्यावेळी या रक्षा कोलकाता येथील लॅब मध्ये परिक्षणासाठी पाठविल्या होत्या. त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये या रक्षांमध्ये श्वानाचे अवशेष आढळून आलेले नाहीत. त्यामुळे शिवरायांच्या चितेत कुत्र्याने उडी घेऊन जीव दिला होता या दंतकथेला काही अर्थ राहत नाही. आम्ही संविधानिक मार्गानेच हा पुतळा हटवणार असून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण करणाऱ्या लोकांना कुणीही बळी पडू नये. ज्याना आक्षेप आहे त्या लोकाना मी खुल्या चर्चेचे निमंत्रण देतो. पण कुणीही दुषित वातावरण करण्याचा प्रयत्न करू नये असे अहवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.








