पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा इशारा
बेळगाव : विकासकामे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांना आमचे नेहमी सहकार्य असणार आहे. मात्र, प्रत्येक काम मुख्यमंत्री किंवा आमच्याकडूनच सांगितले पाहिजे, असे होणार नाही. विकासाकडे पाठ फिरविणाऱ्या व कायदा-सुव्यवस्था परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळता न येणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात थारा नाही, असा इशारा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे.
कुवेंपूनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेशच दिला आहे. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ उपस्थित होते. बेळगाव हा मोठा जिल्हा आहे. जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखणे, नागरिकांचे हित जपणे गरजेचे आहे. जर कर्तव्यात कसूर केल्यास सरकार आणि पर्यायाने आमचीही बदनामी होते. काही घटनांमध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यात अपयशी ठरल्याने पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
हिडकल जलाशयातून धारवाड येथील औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला तीन खात्यांनी परवानगी दिली आहे. धारवाड येथील केआयएडीबीच्यावतीने कामे राबविण्यात येत आहेत. सुमारे 110 किलोमीटर पाईपलाईनच्या माध्यमातून धारवाडला पाणी नेले जात आहे. नेमके किती पाणी देणार आहेत? याविषयी आपल्याला माहिती नाही. यासंबंधी बैठक घेऊन बेळगावला पाण्याचा अभाव जाणवू नये, यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
झोपडपट्टी विकास मंडळात बेळगाव जिल्ह्यात गैरकारभार सुरू आहे. याकडे पत्रकारांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता दोन वेळा विकास आढावा बैठकीत स्लम बोर्डचे अधिकारी गैरहजर होते. कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या कामांची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल, असे सांगतानाच कन्नड भाषेबद्दल तमिळ अभिनेते कमल हासन यांनी केलेल्या वक्तव्याचे खंडन करीत कमल हासन यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. आरसीबी विरुद्ध पंजाब क्रिकेट सामन्यात आरसीबीचा विजय होवो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी दिली.









