पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची माहिती
पणजी : शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत तथ्य शोध समितीने सरकारला अहवाल सादर केला असला तरी अहवालाबाबत राज्य सरकारकडून पोलिस विभागाला अद्याप कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत, असे पोलिस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार यांनी सांगितले. आम्ही पुढील सूचनांची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले. पणजीत झालेल्या एका कार्यक्रमाला डीजीपी अलोक कुमार आले असता त्यांना पत्रकारांनी अहवालाबाबत विचारले होते तेव्हा त्यांनी वरील उत्तर दिले. शिरगाव येथे वार्षिक लईराई जत्रात्सवदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या तथ्य शोध समितीने अलीकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आपला अहवाल सादर केला आहे.
रस्ते सुरक्षेच्या मुद्यावर बोलताना, डीजीपी म्हणाले की मुलाना बालपणापासूनच जबाबदार रस्ते वर्तन शिकवण्याचे महत्त्व आहे. कारण आजची मुले ही उद्याचे नागरिक असतात आणि लहानपणीच वाहतूक नियम किंवा रस्त्यावरील जबाबदारपणाची वागणूक त्यांच्या अंगवळणी पडते. वाहन चालविताना प्रत्येकाने जबाबदार रस्ता वापरकर्ता असले पाहिजे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दखल घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी बालपणापासूनच अंगवळणी पडल्यास पुढे त्या सहज होतात. म्हणून हे शिक्षण शालेय स्तरावरून सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे आलोक कुमार म्हणाले.









