अमिताभ कांत यांचे प्रतिपादन : ‘फंड ऑफ फंड्स’ ची संकल्पना मांडली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवकल्पना व पोषक वातावरणात सुरु केलेल्या स्टार्टअप्समुळे जागतिक स्तरावरील आव्हानांवर मात करता येऊ शकत असल्याचे प्रतिपादन अमिताभ कांत यांनी केले आहे. उत्तम व्यवसायवृद्धी साध्य करण्यासाठी ‘चांगल्या स्टार्टअप’साठी निधीची कमतरता नसल्याचे कांत यांनी स्पष्ट केले आहे.
स्टार्टअप 20 परिषदेमध्ये, कांत यांनी ‘फंड ऑफ फंड्स’ (दुसऱ्या फंडात गुंतवणूक करणारा फंड), क्रेडिट सुविधा योजना आणि मजबूत स्टार्टअप वातावरणासाठी उत्तम प्रशासन यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, भारतीय स्टार्टअप्सनी कमी खर्चात यशस्वीरित्या उद्योगाची वाटचाल चांगली सुरु ठेवली आहे.
कांत म्हणाले की, स्टार्टअप क्षेत्रात निधीची कमतरता बिलकुल नाही आणि चांगल्या स्टार्टअपसाठी भांडवल नेहमीच उपलब्ध असते. गुंतवणूकदारांची व इतर इच्छुकांची नजर नेहमीच चांगल्या प्रकल्पांवर असते. उत्तम डिजिटल सार्वजनिक साधनसुविधा भारतात उपलब्ध होत असून डिजिटल पेमेंटमध्ये झालेली लक्षणीय वाढ अशा गोष्टी स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहनात्मक ठरत आहेत.
देशाची डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ताकद
आपल्या देशाने आपली डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील ताकद दाखवून दिली आहे. ते म्हणाले, भारतात 1,00,000 हून अधिक स्टार्टअप्स आणि 108 युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचे स्टार्टअप) आहेत. कांत यांनी स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी स्वयं-नियमन आणि उत्तम प्रशासनाच्या गरजेवरही भर दिला.









