गोव्यातील केंद्रीय कार्यालयांत भ्रष्टाचार नाही : सीबीआयचे अधीक्षक आशिष कुमार यांचे मत
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील केंद्रीय सरकारी कार्यालयात गेल्या 5 वर्षात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, आणि तेथील अधिकारी, कार्मचारी भ्रष्टाचार करीत नाहीत, असा दावा गोवा सीबीआय भ्रष्टाचार विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक आशिष कुमार यांनी केला आहे. गोव्यातून गेल्या 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराची तक्रार आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
बांबोळी येथील गोवा सीबीआय कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी आणि त्याची नोंद करण्यासाठी जनतेला हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. परंतु गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचाराची किंवा लाच देण्या-घेण्याची किंवा मागणीची एकही तक्रार आली नाही. याचा अर्थ गोव्यातील केंद्रीय सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत नाही, असे कुमार यांनी ठामपणे सांगितले.
क्षमतेपेक्षा जास्त माया किंवा मालमत्ता जमविल्याची गोव्यातून एकही तक्रार नाही. याचा अर्थ गोव्यात भ्रष्टाचार होत नाही. हे एक प्रकारे रामराज्य म्हणावे लागेल. म्हणजे गोमंतकीय जनता सावध आणि सुजाण असून ती भ्रष्टाचाराला थारा देत नाही, असे मत कुमार यांनी मांडले आहे. जर गोव्यात भ्रष्टाचार होत असेल, लाच मागितली किंवा दिली जात असेल तर लोकांनी सीबीआयकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.









