प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडून स्पष्ट समाज माध्यमे, प्रसार माध्यमांत चाललेली चर्चा हवेतच
प्रतिनिधी / पणजी
मंत्रीमंडळ पुनर्रचना करणे हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यासंदर्भात त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल तर मुख्यमंत्री सर्वात आधी ते पक्षाला जाणीव देतील. त्यासंदर्भात सध्यातरी त्यांनी काहीच सांगितलेले नाही. त्यामुळे लोकांमध्ये चाललेल्या चर्चा म्हणजे अफवाच असल्याचे स्पष्ट आहे, असे भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी स्पष्ट केले.
पणजीत भाजप मुख्यालयात काल गुऊवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रीमंडळ पुनर्रचनेसंदर्भात सध्यातरी विविध प्रसारमाध्यमांतून बातम्या, चर्चाच सुरू आहेत. काही लोक तर पुनर्रचनेची तारीख आणि वेळ सुद्धा स्वत:च ठरवून आम्हाला सांगतात, हे सर्व प्रकारच अचंबित करणारे आहेत. सध्यातरी नक्की काहीच समजलेले नाही. पक्षीय पातळीवर तर तशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि जोपर्यंत नक्की ठरत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी अफवाच म्हणाव्या लागतील, असे ते पुढे म्हणाले.
नेत्यांचे गोव्यात येणे पुनर्रचनेसाठी नव्हे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील निवडणूक तोंडाजवळ पोहोचली असल्याने बहुतेक केंद्रीय नेते त्या राज्यात विविध भागात दाखल होत आहेत. यातील बहुतेकजण हे गोवामार्गे कर्नाटकात जातात. परंतु त्यांचे येणे म्हणजे पुनर्रचनेसाठीच, असा समज येथील काही लोक करून घेतात व त्यातून अफवा पसरविल्या जातात. प्रत्यक्षात यासंदर्भात राज्यात कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
चर्चिल हे भाजपचे हितचिंतक
चर्चिल हे भाजपचे हितचिंतक आहेत. वेळोवेळी ते भाजपबद्दल बोलत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही ते चांगली स्तुती करतात. त्यांच्या कार्याची वाखाणणी करतात. त्याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशीही त्यांची चांगली मैत्री आणि जवळीक आहे. तसेच लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार विजयी होतील असे अत्यंत विश्वासपूर्वक मतप्रदर्शनही ते करत असतात. परंतु याचा अर्थ ते स्वत: भाजपात प्रवेश करतील असा होत नाही, असे तानावडे म्हणाले.
चर्चिलबाबत कोणतीही बोलणी नाही
अन्य एका प्रश्नावर बोलताना तानावडे यांनी चर्चिल आलेमाव यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातही अशीच चर्चा सुरू असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्याबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही. ते स्वत:ही आजपर्यंत मुख्यमंत्री किंवा आपणाजवळ बोललेले नाहीत. त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास त्यावर आम्ही अवश्य विचार करू व पुढील निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवू, असे तानावडे म्हणाले.









