ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे प्रतिपादन : सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात
बेळगाव : तुम्ही शब्दांवर प्रेम करा, शब्द तुमच्यावर प्रेम करतील आणि हेच शब्द तुम्हाला कीर्तीपर्यंत नेऊन पोहोचवतील. उदयोन्मुख लेखक-कवींना संधी मिळत नाही, हे अर्धसत्य आहे. उत्तम लेखक होण्यासाठी एका लेखकाच्याच घरी जन्माला येण्याची गरज नाही. आपल्यामध्ये सृजनशीलता निर्माण करायला हवी. त्यातूनच उत्तम लेखक, कवी आणि साहित्यिक निर्माण होतील. जात, धर्म, पंथ, रंग, भेद याला छेद देऊन जे बाहेर येतात, तेच जगाला दिशा देतात. मात्र, यासाठी अफाट कष्ट महत्त्वाचे आहेत, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित सहावे अ. भा. ब ळगाव मराठी साहित्य संमेलन रविवारी मराठा मंदिरमध्ये झाले. यावेळी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर वाय. बी. चव्हाण, युवराज हुलजी, महादेव चौगुले, शिवाजी मंडोळकर, शिवाजी अतिवाडकर, दिगंबर पवार, सुनील आपटेकर, पंढरी परब आदी उपस्थित होते.
विश्वास पाटील पुढे म्हणाले, एखादा शिल्पकार मूर्ती तयार करताना जोपर्यंत ती मूर्ती त्याच्याकडे बघून हसत नाही, तोपर्यंत रेखाटत राहतो. त्यातूनच सुंदर कलाकृती निर्माण होते. यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटी निरंतर ठेवणे आवश्यक आहे. शहाजी महाराजांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. देशातील महान अकरा राजांपैकी शहाजी महाराज एक होते. अशा महापुरुषाचा विसर पडला आहे, हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्माबरोबर संपूर्ण मानव जातीलाच कवटाळले आहे आणि आपल्या कर्तृत्वाने अमरतेच्या पट्ट्यात जाऊन बसले आहेत. स्त्राr जातीच्या वैभवाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना पाहिले जाते. अशा संभाजी महाराजांनी लहान-मोठ्या 114 लढाया यशस्वी केल्या. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्णत्वाकडे नेण्याचे कार्य केले.
राष्ट्रासाठी, भाषेसाठी व लोकांसाठी कसे जगावे, हे शिवाजी महाराजांकडून शिकावे. तर देशासाठी त्याग, बलिदान आणि देशभक्ती हे संभाजी महाराजांकडून शिकावे, असे सांगत छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासातील काही मुद्दे समोर ठेवले. खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही. इतिहासाला वेगळे वळण देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न असंख्यांनी केला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती हरवली
सत्र दुसरे-संमेलनातील दुसऱ्या सत्रात डॉ. संजय कळमकर म्हणाले, साहित्यातील साहित्यातून वेळोवेळी आनंद निर्माण होतो. त्यादृष्टीने आपण पाहिले पाहिजे. बेळगावकरांच्यामध्ये मराठीसाठी असलेली तळमळ महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मराठी भाषा वळवावी तशी वळते. भाषेमध्ये असलेली लवचिकता नवसाहित्याला बळ देते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुस्तक आणि वाचन हरवत चालले आहे. वाचनातून मिळणारा आनंद दीर्घकाळ टिकतो आणि जीवनाला नवीन दिशा देतो. मात्र, आजच्या काळात मोबाईल, व्हॉट्सअॅप, इंटरनेट, फेसबुक आदींमुळे माणसातील भावना आणि संवेदना हरवली आहे. माणूस माणसापासून दुरावला गेला आहे. माणसा-माणसातील बोलणे कमी झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुसंस्कार, संस्कृती आणि घरपणही लुप्त होत आहे, असे सांगत ग्रामीण भागातील काही उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानामुळेच घरातील पुस्तक आणि ग्रंथ नाहीसे झाले आहेत. त्यामुळे आनंदही हरवत चालला आहे. याला सुशिक्षितपणा म्हणता येईल, पण सुसंस्कृतपणा म्हणता येणार नाही. मराठीचे सौंदर्य वाढविण्यासाठी पुस्तक वाचन काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. शरद गोरे
अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे म्हणाले, साहित्याची अभिरुची निर्माण करायला हवी. साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. साहित्यात संदिग्धता निर्माण झाली आहे, ती दूर करण्यासाठी साहित्यिक, लेखक, कवी आणि पत्रकारांनी सत्याची भूमिका मांडायला हवी. ज्या देशात साहित्यिकांना, विचारवंतांना किंमत नाही, ते राज्य व तो देश रसातळाला जातो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन व्हायला हवे होते, ते झाले नाही. मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, संस्कृत, इंग्रजी, ऊर्दू भाषांमध्ये भेदभाव नको. भाषेमधील विचार घेतले पाहिजेत आणि ते अंगिकारलेही पाहिजेत. सत्याचा शोध लावण्यासाठी इतर भाषांचा अभ्यासही आवश्यक आहे. आचार विचार कोसो दूर गेले असून त्यासाठी वैचारिक पायाभरणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्घाटक आप्पासाहेब गुरव
मराठी अस्मितेसाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून जागृती निर्माण व्हायला हवी. भाषा ही केवळ शब्दांची नाही तर माणुसकीची आहे. बेळगाव ही मराठी अस्मितेची भूमी आहे. या भूमीतूनच अनेक साहित्यिक, कवी तयार झाले आहेत. मराठी भाषेची उंची वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.
स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील
माणुसकी जपणारे साहित्य निर्माण करायला हवे, अन्याय-अत्याचार, गळचेपी दूर व्हावी यासाठी मराठी भाषिकांनी एकत्र येऊन अशाप्रकारे साहित्य संमेलन भरविणे आवश्यक आहे. भाषा टिकविणे, रुजविणे आणि वृद्धिंगत करणे जरुरीचे आहे. भाषा आणि साहित्याच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. प्रारंभी अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. शिक्षणप्रेमी दीपक किल्लेकर, स्मिता किल्लेकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीचे उद्घाटन झाले. शिवाय प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
‘जागर लोकसंस्कृतीचा’ कार्यक्रमाला दाद
सत्र तिसरे-संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘जागर लोकसंस्कृतीचा’ हा कार्यक्रम रंगला. यामध्ये शाहीर अभिजित कालेकर व सहकाऱ्यांनी रसिकांचे प्रबोधन केले. यामध्ये वासुदेव, हेळवी, पोवाडा, अभंग, नंदीबैल, गोंधळ, गणगवळण, पिंगळी, लावणी, रुपक, भजन, ओवी, जोगवा आदी लोककलांचे सादरीकरण केले. याला रसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. शकुन व भविष्य सांगून उपजीविका करणाऱ्या वासुदेव, हेळवी, नंदीबैल आदी ग्रामीण भागातील जीवनाशी व कृषी संस्कृतीशी निगडीत असणारे चित्र उभे केले. त्याचबरोबर लोकांची वंशावळी सांभाळणारे व त्यात नवीन नावे घालणे, कुळाचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा पारंपरिक व्यवसायही सादर केला. शिवाय खास आवाजाच्या ठेक्यात हेळव्यांनी वंशावळ वाचून दाखवली. त्याचबरोबर ‘अबीर-गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ हा अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्याबरोबरच भारदस्त आवाजात पोवाडा सादर केला. ग्रामीण भागातील जात्यावरील महिलांची गीते सादर झाली. लोकगोंधळ सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. यामध्ये ज्ञानेश्वर सुतार, कृष्णा पाटील, नामदेव पाटील, मष्णू पाटील, आरती सुतार, भारती सुतार, गणेश सुतार, जोतिबा पाटील आदी कलाकारांचा सहभाग होता.









