सनातनच्या वादावर मद्रास उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
वृत्तसंस्था /चेन्नई
सनातन धर्मावर सुरू असलेल्या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती एन शेषशायी यांनी सनातन धर्माबाबत सध्या देशात सुरू असलेल्या जोरदार वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांवर चिंता व्यक्त केली. अभिव्यक्ती किंवा भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी याचा अर्थ असा नाही की द्वेषयुक्त भाषण दिले जावे, विशेषत: जेव्हा ते कोणत्याही धर्माशी संबंधित असेल. अशा भाषणाने कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक धर्म हा श्र्रद्धेवर आधारित असतो आणि श्र्रद्धेचा स्वभाव असमंजसपणाला सामावून घेतो. त्यामुळेच धर्माशी संबंधित बाबींमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला जातो, तेव्हा ते कोणालाही दुखावले जाणार नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत, मुक्त भाषण म्हणजे द्वेषयुक्त भाषण असू शकत नाही, असे खडे बोल न्यायमूर्तींनी सुनावले. तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे. या विधानानंतर मंत्र्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांशी करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
सनातन धर्म हा जातियवाद आणि अस्पृश्यतेला प्रोत्साहन देणारा असल्याची कल्पना त्यांनी ठामपणे नाकारली. न्यायालयाने यावर जोर देत सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा एक समूह असून त्यामध्ये राष्ट्र, राजा, आई-वडील आणि गुऊ यांच्या प्रति कर्तव्य आणि गरिबांची काळजी घेणे समाविष्ट असल्याचे नमूद केले. समान नागरी हक्क असलेल्या देशात अस्पृश्यता खपवून घेतली जाऊ शकत नाही, असेही न्यायमूर्ती शेषशायी यांनी स्पष्ट केले.









