कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे संसदेत विधान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेत वार्षिक 6 हजार रुपयांच्या रकमेत वाढ करण्याचा कुठलाच प्रस्ताव सध्या नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱयांना दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये प्रदान केले जातात.
पीएम-किसान योजनेच्या निधीत वाढ करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही. पीएम-किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱयांच्या बँकेत खात्यामध्ये दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. या रकमेतून बियाणे, खत इत्यादी खरेदी करण्यासाठी सरकारकडून सहाय्य केले जात असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले आहे.
चालू वर्षी 30 जानेवारी रोजी सरकारने शेतकऱयांच्या बँक खात्यात या योजनेचा एक हप्ता जमा केला आहे. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सरकारने एप्रिल 2016 मध्ये आंतर-मंत्रिमंडळीय समिती स्थापन केली होती. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱया मुद्दय़ांची ओळख पटवत त्याकरता धोरणांची शिफारस या समितीकडून करणे अपेक्षित होते असे तोमर यांनी म्हटले आहे.
समितीकडून अनेक शिफारसी
समितीने स्वतःचा अंतिम अहवाल सप्टेंबर 2018 मध्ये सोपविला होता. यात शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध धोरणे, सुधारणा आणि कार्यक्रमांच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या. शेतकऱयांच्या उत्पन्नाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात दुप्पट करण्यासाठी याच शिफारसींवर अंमलबजावणी केली जात आहे. याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत असे ते म्हणाले. इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्चने (आयसीएआर) एक पुस्तिका प्रकाशित केली असून यात 75 हजार शेतकऱयांचे उत्पन्न दुपटीहून अधिक झाल्याचा तपशील नमूद आहे.
हवामान बदलाचा परिणाम
हवामान बदलामुळे देशात नवे आजार निर्माण होत आहेत. या आजारांमुळे माणसांपासून पशू तसच पिकांचे आरोग्य बिघडत आहे. प्रदूषित हवा, हवामान बदल आणि उष्णतेसंबंधीच्या आजारांमुळे हाडांचे अन् पाण्यासंबंधीचे आजार होत आहेत. या आजारांची ओळख पटवत क्लायमेट चेंज अँड ह्युमन हेल्थने राष्ट्रीय कृती कार्यक्रम तयार केला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली आहे.









