शरद पवारांची दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे-राहुल गांधींशी चर्चा : पुढील संयुक्त बैठकीबाबत नियोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘इंडिया’ आघाडीतील दोन महत्त्वाच्या घटक पक्षांचे नेते पुन्हा एकदा शुक्रवारी एकत्र दिसले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवार, 6 ऑक्टोबरला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. विरोधी पक्षांची युती असलेल्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’च्या (इंडिया) योजनांवर चर्चा करण्यासाठी दोन्ही महत्त्वाच्या पक्षनेत्यांची ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड करत ‘आम्ही प्रत्येक आव्हानासाठी सज्ज आहोत. जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ अशी टॅगलाईन जारी केली.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवारांसोबतच्या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत राहुल गांधींसह देशातील जनतेचा आवाज पुढे नेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शरद पवार यांनीही या भेटीची छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी सौजन्यपूर्ण भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गुरदीप सप्पल उपस्थित होते. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपशी मुकाबला करू इच्छिणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीशी संबंधित सध्याची राजकीय परिस्थिती आणि मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी चर्चा केली. जवळपास पाऊण तास ही बैठक सुरू होती.
‘इंडिया’ आघाडीची शेवटची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली होती. आता पुढील बैठक घेण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू असून त्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचे समजते. ‘इंडिया’ आघाडीच्या पुढील बैठकीचा आराखडाही त्यांनी तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये भोपाळमध्ये होणारी ‘इंडिया’ आघाडीची संभाव्य संयुक्त जाहीर सभा रद्द झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी ही चर्चा झाली. उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह द्रमुक नेत्यांनी ‘सनातन धर्मा’विरोधात केलेल्या वक्तव्यावरून मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्या विरोधामुळे ही बैठक होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांची पुढची बैठक पश्चिम बंगालमध्ये घेण्याचे काही विरोधी नेते सुचवत आहेत.
जागावाटप चर्चेसाठी महाराष्ट्रात समन्वय समिती
महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी नऊ सदस्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये प्रत्येक घटकातील शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील प्रत्येकी तीन नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेला दुजोरा दिला होता.









