वन्यप्राण्यांचे विद्यार्थ्यांना आकर्षण : सरकारच्या महसुलात भर : संग्रहालय व्यवस्थापनाला उत्पन्नाच्यादृष्टीने दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयात शैक्षणिक सहलींचा ओघ वाढला आहे. त्यामुळे संग्रहालयाच्या उत्पन्नात भर पडली आहे. शिवाय पर्यटकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन महसूल 25 हजारांवरून 35 हजारांवर गेला आहे. शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाला आहे. विशेषत: खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सहली भुतरामहट्टी संग्रहालयातच आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे संग्रहालय व्यवस्थापनाला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून दिलासा मिळाला आहे.
भुतरामहट्टी प्राणिसंग्रहालयाचा विकास साधून या ठिकाणी सिंह, वाघ, बिबटे, अस्वल, मगर, कासव, हरिण, सांबर, चितळ, तरस आदी प्राणी आणले आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये वन्यप्राण्यांविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. संग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान, शैक्षणिक सहलींचे आयोजन संग्रहालयात केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वन्यप्राणी अगदी जवळून पाहता येत आहेत.
विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांविषयी माहिती मिळावी, यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सहली भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात काढल्या जात आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शाळांतील विद्यार्थी येथे येऊ लागले आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालय विद्यार्थ्यांनी फुलू लागले आहे. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात प्रवेश शुल्क आकारणी केली जात आहे. याबरोबरच संग्रहालयात मिनी टायगर सफारी आणि मत्स्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिनी टायगर सफारीचा आनंद लुटता येत आहे.
पर्यटनाला बहर…
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली संग्रहालयात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढत आहे. संग्रहालयात रस्ते, गार्डन आणि लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. येथे सर्व प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बेळगाव, चंदगड, खानापूर, गडहिंग्लज, हुक्केरी, गोकाक आदी ठिकाणांहून पर्यटक आणि शैक्षणिक सहली येत आहेत.
के. एन. वेन्नूर, आरएफओ, भुतरामहट्टी









