वरदमहालक्ष्मी पूजेसाठी खरेदी : महिलांची वर्दळ, फळाफुलांची आवक वाढली
प्रतिनिधी / बेळगाव
श्रावणमासातील वरदमहालक्ष्मीच्या पूजनासाठी बाजारपेठेत फळाफुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महिलांकडून खरेदीची रेलचेल पाहायला मिळाली. विशेषत: पूजेचे साहित्य, पाने, फळे, फुले, हारांना मागणी वाढली आहे.
श्रावणमासानिमित्त धार्मिक पूजा-अर्चा आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याबरोबरच दर गुरुवारी आणि शुक्रवारी पूजा होत असल्याने बाजारपेठेला बहर येऊ लागला आहे. विशेषत: श्रावणात उपवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने साबू, वरी, राजगिरा लाडू, शेंगदाणे आणि फळांना विशेष मागणी आहे. किरकोळ बाजारात अगरबत्ती, कापूर, कापूस, फूलवात, केळीची पाने, अंबोती, हार, फुले, विड्याची पाने, केवडा यांची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
श्रावणमासाला प्रारंभ झाल्यापासून बाजारात फळे, फुले आणि हारांची आवक वाढू लागली आहे. महिलावर्गाकडून अधिक खरेदी होऊ लागली आहे. विशेषत: पूजा-अर्चा आणि धार्मिक विधीसाठीच्या साहित्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पूजेचे साहित्य तेजीत असल्याचे दिसत आहे.
फळे खरेदीलाही पसंती दिली जात आहे. केळी 60 ते 70 रुपये डझन, सीताफळ 160 रुपये किलो, सफरचंद 140 ते 280 रुपये किलो, पेरू 100 रुपये किलो, डाळिंब 100 ते 180 रुपये किलो, पपई 50 ते 60 रुपये नग, मोसंबी 60 ते 80 रुपये किलो, ड्रॅगन फ्रूट्स 200 ते 250 रुपये किलो, अननस 50 रुपये एक असा फळांचा दर आहे.









