उंब्रज / प्रतिनिधी
उंब्रज ता. कराड येथील रहिवाशांकडे रेशन कार्ड आहेत मात्र त्यांना धान्यच मिळत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने या रेशनकार्ड धारकांचे धान्य जाते तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला असुन पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. रेशनिंग विभागाच्या अंधाधुंद कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उंब्रज येथील अनेक रेशनकार्ड धारक, कराडचा पुरवठा विभाग, रेशन दुकान, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीत हेलपाटे मारुन दमले आहेत. मात्र गंभीर समस्याकडे पुरवठा विभागाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. गुरुवारी सकाळी काही रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी वरुन उंब्रजचे सरपंच योगराज जाधव व माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव व ग्रामस्थांनी रेशनिंग दुकानात जावून वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी रेशनिंग घेण्यासाठी दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी होती. तर बहुतांश रेशनकार्ड धारकांना रेशनिंगच दिले जात नव्हते. या कार्ड धारकांना तुमच्या कार्डवर अजून रेशनिंग सुरू झालेले नाही असे दुकानातून सांगितले जात होते. वर्षानुवर्षे हे कार्डधारक रेशन दुकानात हेलपाटे मारुन दमले आहेत. अख्खा कोरोना काळात सर्वांना मोफत रेशन मिळत होते. अजूनही मिळते मात्र अनेक गोरगरीब गरजू कार्डधारक या लाभापासून पासून वंचित राहिले आहेत. आम्ही काय दुसऱ्या प्रांतांतून आलोय का? आमच्यावरच अन्याय का असा सवाल या रेशनकार्ड धारकांकडून केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज ता.कराड येथे रेशन धारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्रामस्थांकडे असणारे रेशन कार्ड नुसते कागदोपत्री दाखवण्यापुरते मर्यादित राहिले असून कित्येक वर्षांपासून या रेशन धारकांना धान्यच मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारक ही वैतागलेत. यासंदर्भात रेशन कार्डधारकांनी अनेकदा पुरवठा विभाग तसेच रेशन दुकानदार यांच्याकडे वारंवार रेशन मिळण्याबाबत मागणी केली आहे. मात्र तरीही या मागणीकडे पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याचे तीव्र पडसाद सध्या उंब्रजमध्ये उमटू लागले असून गुरुवारी सकाळी उंब्रज येथील मार्केट यार्ड येथे असणाऱ्या रेशन दुकानास उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव यांनी लोकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. मात्र वरूनच या लोकांना धान्य येत नसल्याचे रेशन दुकानदाराकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सरपंच योगराज जाधव यांनी सांगितले की, उंब्रज मधील अनेक ग्रामस्थांना रेशन कार्ड असूनही धान्य व इतर सुविधा मिळत नाहीत. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरवठा विभागाकडे मागणीही केली आहे मात्र या मागणीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असून रेशन ग्राहकांची कोणतीही दखल आजतागायत घेतली गेली नाही. यावर तोडगा काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या विरोधात तीव्र प्रकारच्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









