पुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक संतप्त, वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास : पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर /नंदगड
हलगा-नागरगाळी रस्त्यावर आंबेओहोळ नाल्यावर पूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करतेवेळी पूल बांधण्यात आला होता. तो पूल कमकुवत बनला आहे. दोन वर्षांपूर्वी या पुलाला मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे काही दिवस या रस्त्यावरील जड वाहतूक थांबवण्यात आली होती. हे भगदाड बुजवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने पुलावर सिमेंट काँक्रीट घालण्यात आले होते. परंतु सदर कामही निकृष्ट दर्जाचे झाले. शिवाय पुलाच्या दुसऱ्या बाजूने नादुरुस्त रस्ता आहे. त्याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याही परिस्थितीत रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने गेल्यास पुन्हा पुलावर भगदाड पडण्याची शक्यता आहे. वाहनधारक जीव मुठीत घेऊन या पुलावरील रस्त्यावरून जात आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील जनतेतून करण्यात येत आहे.
हलगा-नागरगाळी रस्त्यावर खड्डे
हलशी गावापासून नागरगाळीपर्यंतच्या सुमारे बारा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे ख•s पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या बाजूला मोठ्या चरी पडल्या आहेत. या भागात घनदाट जंगल असल्याने पाऊस मोठा होतो. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाढत्या जंगलामुळे वन्यप्राण्यांची संख्याही वाढली आहे. वन्यप्राणी रस्त्यावर येतात. खड्ड्यांमुळे वन्यप्राण्यांना चुकवून वाहन चालवणे वाहनधारकांना आव्हानात्मक बनले आहे
नंदगड-दांडेलीला जोडणारा जवळचा रस्ता
नंदगडपासून दांडेलीला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच या भागातील कुंभार्डा येथे नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठ असल्याने या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावरून दांडेलीला लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या खड्ड्यांत दिवसेंदिवस वाढत होत आहे
आंबेओहोळ पूल नव्याने बांधून द्यावा-ग्रा.पं.सदस्य सुनील प्रभू
हलगा-नागरगाळी रस्ता या भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठे ख•s पडले आहेत. शिवाय याच रस्त्यावरील आंबेओहोळ पूल कमकुवत बनला आहे. त्यामुळे पावसाळाभर या पुलावरून वाहतूक सुरळीत होण्यास तात्पुरती डागडुजी करणे गरजेचे आहे. व पावसाळ्यानंतर या ठिकाणी नव्याने पूल बांधून द्यावा, अशी मागणी नागरगाळी ग्रा. पं. सदस्य सुनील प्रभू यांनी केली आहे.









