ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघातील दूधाची भुकटी व लोणी चोरीप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा यासाठी खडसेंनी रात्रभर जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे हे रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर झोपले होते. पोलिसांवर दबाव आणून त्यांची ही नौटंकी सुरू होती, अशी टीका केली होती. त्यावर खडसेंनी पलटवार केला आहे.
अधिक वाचा : शिवसेनेचे ‘हिंदुत्व’ वंचितला मान्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीसाठी साद
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, जळगावात मी अनेकांना अडसर ठरत आहे. त्यांना निवडणूका जिंकता येत नाहीत. त्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र सुरू आहे. जामनेरच्या पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असल्याची माहिती मला एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. सध्या राज्यात सुडाचं राजकारण सुरू आहे. यापूर्वीही माझ्यासोबत असं झालं आहे. त्यामुळे मी अशा षडयंत्रांना घाबरणार नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे.








