तिसऱया तिमाहीतली आकडेवारी जाहीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आर्थिक वर्ष 2023 मध्ये तिसऱया तिमाहीत नव्या उमेदवारांच्या भरतीत आयटी कंपन्यांकडून घटच दिसली आहे. सध्याला पश्चिमी देशात जी गोंधळाची स्थिती आहे ती आयटी कंपन्यांना भरती करण्यापासून रोखत असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱया तिमाहीत टीसीएस, इन्फोसिस व एचसीएल टेक यांच्याकडून भरतीच्याबाबतीत निराशा पदरी पडली आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी सेवा देणारी कंपनी टीसीएसने तिसऱया तिमाहीत 7 हजार नव्या उमेदवारांना नोकरी देऊ केली आहे. मागच्या तिमाहीच्या तुलनेत 2500 जण कमीच नोकरीसाठी निवडले गेले आहेत. दुसऱया तिमाहीत कंपनीने 9840 जणांना नोकरीत सामावून घेतले होते.
तर दुसरीकडे दुसऱया नंबरची आयटी कंपनी इन्फोसिसनेही तिसऱया तिमाहीत भरती कमी प्रमाणात केली होती. सदरच्या कालावधीत अंदाजे 6 हजार जणांना कंपनीने नोकरी देऊ केली आहे. जी मागच्या तिमाहीपेक्षा 4 हजारने कमी आहे. दुसऱया तिमाहीत कंपनीने 10,032 जणांना नोकरीत सामावून घेतले होते.
आणखी एक आयटी कंपनी एचसीएल टेकनेदेखील कमी प्रमाणात तिसऱया तिमाहीत नव्या उमेदवारांची भरती केली आहे. तिसऱया तिमाहीत कंपनीने 5,892 जणांना नोकरीत सामावून घेतले आहे.









