नारळ फुटले तरीही खड्डे बुजले नाहीत
प्रतिनिधी/ सातारा
शहरात नारळ फोडण्याचा कार्यक्रम गेल्या दीड वर्षापासून जोरात सुरु आहे. एका गटाने नारळ फोडले की दुसऱया गटाचाही नारळ फुटण्याचा कार्यक्रम रंगतोय. असे असताना शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे अद्यापही तसेच आहेत. अगदी मंगळवार तळय़ाकडून राजवाडय़ाकडे येतानाच्या रस्त्यावर राजवाडा स्टॅण्डनजिक खड्डे पडलेले आहेत. शनिवार पेठेत अंतर्गत रस्ते खड्डेमय आहेत. या रस्त्याच्या कामास कधी प्रारंभ होणार असा सवाल सातारकरांना पडू लागले आहे.
सातारा शहरात दोन्हीही गटाकडून गेल्या दीड वर्षापासून नारळ फोडण्याचे सत्र सुरु आहे. रस्त्यांचे, गटरचे व इतर कामांचे नारळ फुटत आहेत. असे असताना शहरातील रस्त्यांच्या कामांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पालिकेकडून रस्त्याची कामे सुरु करण्याबाबत वारंवार आवाहन केले होते. रस्त्याची कामे सुरु करण्यात येणार आहेत तत्पूर्वी नळ कनेक्शनची लिकेजस काढून घ्या. काही ठिकाणी रस्त्याचे पॅचिंग करण्यात आले. परंतु अनेक ठिकाणी खड्डे अजूनही तसेच आहेत. त्यामध्ये मंगळवार तळय़ाकडून राजवाडय़ाकडे येताना राजवाडा बसस्थानकालगतच दोन खड्डे आहेत. शनिवार चौकातून खाली बुधवारनाक्याकडे जाणाऱया रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. छ. शाहु महाराज चौकातून पुढे वाहतूक शाखेच्या कार्यालयापर्यंत काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मुथा चौक ते जुना आरटी ऑफिस चौक या दरम्यान खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे कधी बुजवणार असा सवाल सातारकरांना पडला आहे.








