अमेरिकेच्या व्यापार धोरणासंबंधी राजनाथसिंग यांचे विधान, केवळ शक्य असते हितसंबंधांचे स्थायित्व
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही एकमेकांचे स्थायी मित्र किंवा शत्रू असत नाहीत, असे महत्वपूर्ण विधान संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध स्थायी हितसंबंधांवर आधारित असतात. त्यामुळे हितसंबंध हे स्थायी असतात, अशी टिप्पणी त्यांनी सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणावासंदर्भात केली आहे. अमेरिकेशी संबंध तणावग्रस्त झाल्याने आता भारताने चीनशी जवळीक वाढविली आहे. या धोरणात्मक परिवर्तनासंबंधी ते भाष्य करीत होते. भारताला आपल्या हितांचे संरक्षण करावे लागणार आहे. भारत ते करण्यास सक्षम आहे, असेही प्रतिपादन त्यांनी सध्याच्या परिस्थितीसंबंधी केले. अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लागू केले आहे. त्यामुळे भारत आता काय करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, भारत आपल्या हितांचे रक्षण करण्यास समर्थ आहे. भारताचे शेतकरी, कारागिर, पशुपालक, मत्स्यपालक आणि इतर प्रभावित समाजघटक यांच्या हितरक्षणाचे उत्तरदायित्व केंद्र सरकारचे आहे. त्यांच्या हितांच्या संदर्भात आम्ही कोणाचाही, कितीही दबाव आला तरी, तडजोड करणार नाही. हा आमचा निर्धार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
कोणालाही शत्रू नाही मानत
भारत कोणालाही आपला शत्रू मानत नाही. तथापि, भारतात अनेक घटक असे आहेत, की ज्यांना संरक्षणाची आवश्यकता आहे. त्यांचे रक्षण करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. आमचे शेतकरी आणि लघुउद्योजक आमच्याकडे आशेने पहात आहेत. त्यांच्या कल्याणाच्या संदर्भात आम्ही कोणाशीही तडजोड करु शकत नाही. अशा घटकांच्या हितरक्षणाला आम्ही सर्वात अधिक प्राधान्य देत आहोत, हे भारताचे धोरण त्यांनी एका वृत्तसंस्थेच्या संरक्षण शिखरपरिषदेत स्पष्ट केले.
दबाव अधिक तितके वाढते सामर्थ्य
जितका दबाव अधिक येतो, तितकी सामर्थ्यातही वाढ होते. भारताच्या संदर्भातही तेच होणार आहे. आमच्यावर कोणीही कितीही दबाव आणला, तरी भारत झुकणार नाही. उलट आमची शक्ती अधिक वाढणार आहे. कोणत्याही स्थितीसाठी आम्हाला सज्ज रहावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये अनेकदा असे प्रसंग येत असतात. ते दुर्बळपणे हाताळून काम भागत नाही. आपण ताठपणे त्यांना तोंड द्यावे लागते, असेही प्रतिपादन राजनाथसिंग यांनी केले.
दुसरे मंत्री
अमेरिकेचे किंवा डोनाल्ड ट्रंप यांचे नाव न घेता अमेरिकेच्या धोरणांचा टीकात्मक उल्लेख करणारे राजनाथसिंग हे दुसरे केंद्रीय मंत्री आहेत. नुकतेच पियूष गोयल यांनीही अशाच प्रकारचे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे, दबावात न येण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आज जगात आर्थिक स्वयंहिताचे राजकारण केले जात आहे. त्यासाठी दबाल आणला जात आहे. तथापि, आमच्या सरकारसाठी भारतील शेतकरी, लघु उद्योजक, पशुपालक आणि मत्स्यपालक यांचे हित हे सर्वतोपरी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी अहमदाबादमध्ये केले.
नवी समीकरणे मांडली जाणार ?
अमेरिकेच्या असमतोल आणि अतर्क्य व्यापार शुल्क धोरणामुळे जगात मोठी उलथापालथ घडताना दिसून येत आहे. भूराजकीय समीकरणे झपाट्याने दिशा परिवर्तन करीत आहेत. एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे देश एकमेकांच्या नजीक येत आहेत. भारत-रशिया-चीन या तीन शक्ती एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी चीनमध्ये आगमन झाले असून, ते शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होणार आहेत.









