अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, नामरूपात्मक प्रपंच हा मिथ्या असल्याने मायेने व्याप्त असतो परंतु ज्ञानाभिमानी पंडित तो खरा मानतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंच रचनेचे कौशल्य खरे मानावे तर ते देहबुद्धी वाढवते आणि माणसाला दु:ख आणि दारिद्र्याचा अनुभव देते. खरं म्हणजे वेदाभ्यास करणाऱ्यांची योग्यता थोर असते. प्रसंगावधानी असल्याने कोणत्या वेळी कसे वागावे, कुठे काय बोलावे हे त्यांना चांगले कळत असते पण हे सर्व नैपुण्य त्यांच्याकडे असल्याने त्यांचा देहाभिमान अतोनात वाढलेला असतो. ते अहंमन्य आणि गर्विष्ठ असतात. स्वत:च्या योग्यतेमुळे ते अतिआत्मविश्वासी झालेले असतात. अशा ह्या देहाभिमानाने नागवल्या गेलेल्या अहंमन्य पंडितांच्या बोलण्याकडे दीन लोकांनी बिलकुल लक्ष देऊ नये. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यास निश्चित अध:पात होतो.
एकप्रकारे हे पंडित लोक विषच खात असतात. ज्यांचा विष खाणाऱ्यांच्यावर विश्वास असतो आणि जे त्यांचे म्हणणे खरे मानतात, त्यांना त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्यावर अनिष्ट प्रसंग ओढवतात आणि त्यांना मरणाला सामोरे जावे लागते. म्हणून त्यांची संगती कदापि करू नये, ते सांगतात तसे वागू नये, त्यांचाशी बोलूसुद्धा नये. त्यांचा सर्वस्वी जीवभावाने त्याग करावा. ज्यांना अशा ज्ञानाभिमानी माणसांची भूल पडते ते स्वत:चे वाटोळे करून घेतात. त्यांना स्वत:च्या घरी आणू नये, आपण त्यांच्या घरी जाऊ नये, त्यांना कोणत्याही बाबतीत सल्ला विचारू नये. ते स्वत:चा घात तर करून घेत असतातच आणि त्याचबरोबर त्यांच्या नादाला लागणाराही त्यांच्याबरोबरच बुडतो. म्हणून त्यांची संगती निश्चयपूर्वक टाळावी. देहाभिमानी पंडितांची साथसांगत कदापि करू नये. ह्याबद्दल सविस्तर सांगून झाल्यावर भगवंत आता साधकाच्या योगाभ्यासाबद्दल सांगत आहेत.
ते म्हणाले, साधकाला जेव्हा योगाभ्यास करायची तीव्र इच्छा होते तेव्हा तो त्यापाठीमागे लागतो पण त्याची इच्छा सहजासहजी पूर्ण होत नाही, कारण त्यामध्ये अनेक अडथळे येतात. ते अडथळे अनेक प्रकारचे असतात. उदाहरणार्थ कधी त्याला शरीराचे आजारपण सतावत असते तर कधी एखाद्या विषयाचा उपभोग त्याला सतावत असतो. काहीवेळा आपल्याला सगळं येऊ लागलंय अशा भ्रांतीने तो योगमार्गापासून विचलित होतो. एव्हढेच नव्हे तर काहीवेळा त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व होतो. तो स्वत:ला श्रेष्ठ समजू लागतो. त्यातूनच त्याला इतरांच्यातील दोष दिसू लागतात आणि त्यासंबंधी मनात येणाऱ्या विचारात तो गुंतून पडतो.
योगमार्गात तर मनात येणाऱ्या विचारांना रोखून धरायचे असते आणि हा विचारांच्या गुंत्यात स्वत:ला अडकवून घेतो. नैसर्गिक वातावरणाच्या बदलामुळेही कधी कधी त्याच्या योगाभ्यासात खंड पडतो. कधी त्याला थंडी वाजू लागते तर कधी उकडू लागते. शारीरिक अडथळे तर अनेक प्रकारचे असतात. कधी त्याला पोटातील वायूचा उपद्रव होतो तर कधी भूक आवरेनाशी होते. अशा उपद्रवामुळे त्याचे पित्त खवळते आणि त्याचीही अडथळ्यात भर पडते. आणखीन सांगायचे म्हणजे परस्त्राr, परद्रव्य ह्यांचीही कधी कधी साधकाला आसक्ती म्हणजे ओढ वाटू लागते.
उद्धवा, साधकाला कितीही मनापासून वाटत असले की, आपण योगाभ्यास करावा तरी ते मी वर सांगितलेल्या अडथळ्यामुळे सहजासहजी शक्य नसते. आता ह्यावर उपाय कोणते तेही सांगतो ऐक, देहात शीतलता वाढली की उष्ण पदार्थ खावेत. देहात उष्मा वाढला की थंड पदार्थ खावेत. पोटात साठलेल्या वायूचा त्रास होऊ लागला तर भूक खवळते आणि ती कितीही खाल्ले तरी शांत होत नाही.
अशावेळी प्राणायाम करून प्राण आणि अपान समान करावेत. प्राणापानाची साम्यता झाली की त्यांचातले ऐक्य वाढते आणि मग षटचक्रे भेदायला फारसा वेळ लगत नाही. हे साध्य झाले की, खवळलेली भूक शांत होते. योगाभ्यासात येणाऱ्या इतर अडचणीबद्दल आता पुढे सांगीन.
क्रमश:
Previous Article‘द घोस्ट ऑफ गांधी’मध्ये डेजी शाह
Next Article पुरुष, महिला हॉकी फाईव्ज संघ जाहीर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.