आज जागतिक नारळ दिवस : गोव्याच्या नारळाचा वेगळेपणा,कडी, हुमणात नारळ हवाच हवा
प्रज्ञा मणेरीकर/ पणजी
श्रीफळ म्हटले की, आपल्या लाडक्मया गोव्याचा सुंदर निसर्ग डोळ्यांसमोर येतो. कारण इथे नारळ-पोफळीच्या मोठमोठ्या बागा आहेत. तसे बघितले, तर सर्व कोकण किनारपट्टीत, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये नारळाची झाडे आहेत. सगळेच नारळ चांगले, पण गोव्यातील नारळाची चव आगळीवेगळीच असते. गोड पाणी व आतील गर देखील गोड व ऊचकर. परंतु सध्या गोव्यात नारळ क्षेत्र अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. नारळ झाडावरून पाडण्यासाठी पाडेली मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे नारळ क्षेत्राचे भवेतव्य जपून ठेवण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. नारळाची बहुमुखी उपयुक्तता आणि त्याची मागणी लक्षात घेऊन, 2 सप्टेंबर 1969 रोजी ‘एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी’ सुरू झाली. जकार्ता, इंडोनेशियात या दिवशी एपीसीसीचीची स्थापना झाली.
आरोग्यदायी नारळ
आपल्या देशात अनेक शतकांपासून नारळाचे आध्यात्मिक आणि औषधी मूल्य आहे. याला तर निसर्गाने दिलेली भेट म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नारळाच्या प्रत्येक भागाला खूप महत्त्व आहे. नारळ मूत्राशय साफ करणारा, पौष्टिक, शक्तिशाली, जंतुनाशक आणि वात-पित्त नष्ट करणारा आहे. त्याच्या थंड प्रभावामुळे, त्याचे पाणी सर्व शारीरिक समस्यांपासून आराम देते. बहुपयोगी अशा नारळाच्या झाडाला ’कल्पवृक्ष’ म्हटलं जातं. कारण नारळाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी माणसासाठी फार उपयोगी आहेत. नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला.
कडी, हुमणात नारळ हवाच
गोवा आणि नारळाचे नाते प्राचीन आहे. इथे सहाव्या शतकामध्येही नारळ होता, असा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. मराठी आणि कोकणीमध्ये नारळाच्या प्रत्येक भागास आणि कृतीस स्वतंत्र असे शब्द आहेत. प्रामुख्याने किनारपट्टी भागांतील लोकांच्या आहारात नारळाचा तसेच नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. गोमंतकीयांच्या प्रत्येक आमटीत (कढी, हुमण) नारळाचा वापर हमखास होतोच. त्यामुळे नारळ हा गोमंतकीयांच्या खाद्यजीवनशैलीचा अविभाज्य घटक मानला जातो.
सासष्टीत मोठ्या प्रमाणात नारळ
गोव्यात मागील काही वर्षांपासून नारळ पिकाबाबतीत उदासीनता दिसून येते. राज्यातील सर्वच किनारी तालुक्यांमध्ये नारळाचे उत्पादन घेतले जाते. याचबरोबर सासष्टीमध्ये नारळाचे जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यानंतर काणकोण, सांगे, मुरगाव, तिसवाडी, बार्देश आणि पेडणे या तालुक्यात उत्पादन घेतले जाते.
गोव्यात दरवर्षी पिकतात बारा कोटी नारळ
नारळाच्या लागवडीपासून वाढीपर्यंत गोव्यातील नैसर्गिक वातावरण नारळाला पोषक असंच आहे. गोव्यात समुद्र आहे, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पण तरीसुद्धा नारळाच्या राष्ट्रीय उत्पादनात गोव्याचा वाटा अर्ध्या टक्क्याहूनही कमी आहे. गोव्यात वर्षाला साधारण दहा ते बारा कोटी नारळाचे पीक येतं असं सांगण्यात येतं. परंतु यात काही बदल झालेला दिसून येत नाही.
मागणी वाढतेय, पीक मात्र वाढत नाही
गोंयकारांच्या घरात दिवसाला दोन तरी नारळ जेवणात वापरले जातात. त्याशिवाय गेल्या दोन दशकांमध्ये गोव्यात वाढीस लागलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे हॉटेल व्यवसायातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे गोव्याच्या बाजारपेठेत नारळाला कायम चांगलीच मागणी असते. इतकी मागणी असूनही गोव्यातील नारळ उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली मात्र दिसत नाही. नारळासाठी गोमंतकीयांनी पाऊले उचलणे आवश्यक आहे.









