जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 8 हजार जणांचा घेतला चावा : आतापर्यंत 2 हजार 300 कुत्र्यांचे करण्यात आले निर्बिजीकरण
बेळगाव : शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: मेटाकुटीला आली आहे. याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता शहरामध्ये 19 हजार 450 भटकी कुत्री असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर जिल्ह्यामध्ये 71 हजार भटकी कुत्री असून ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहेत. महानगरपालिकेच्या अखत्यारिमध्ये कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण करण्यासाठी दरवर्षी 50 लाख रुपये खर्च होतात. गेल्या दीड वर्षात या कुत्र्यांनी 20 हजार 539 जणांवर हल्ला केल्याची नोंद झाली आहे. कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्यासाठी 1560 रुपये खर्च येतो. जुलै महिन्यामध्ये नव्याने निविदा काढल्या आहेत. मात्र, निविदेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये केरळ, आंध्रप्रदेश येथील कंत्राटदार अधिक संख्येने आहेत. त्यांचा दर महानगरपालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे आम्ही योग्य कंत्राटदाराच्या शोधात आहोत, असे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी सांगितले. सध्या महापालिकेकडे निर्बिजीकरण करणारे एकच केंद्र आहे. दोन केंद्रे होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या असलेल्या श्रीनगर येथील केंद्रामध्ये दररोज पाच ते सहा कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येते. आतापर्यंत 2 हजार 300 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्यांचा कळप अचानकपणे हल्ला करत असल्यामुळे जनतेला जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हॉटेलमधूनही मिळणारे टाकाऊ अन्न सध्या कुत्र्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे कुत्री चवताळलेली आहेत. रात्रीच्या वेळी अचानक ती हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांसह लहान मुलांनासुद्धा ये-जा करणे कठीण झाले आहे.
2018-19 च्या पशू गणनेनुसार आकडेवारी
भटक्या कुत्र्यांबाबत सर्व्हे केला असता जिल्ह्यामध्ये 71 हजारहून अधिक भटकी कुत्री असल्याचे सांगण्यात आले. शहराबरोबर ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. 2018-19 च्या पशु गणनेनुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 41 हजार 883 कुत्र्यांना रेबिजची लस दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर यावर्षी 1 हजार 438 कुत्र्यांचे आतापर्यंत रेबिज लसीकरण करण्यात आले असून ही प्रक्रिया यापुढेही सुरूच ठेवली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 2022 मध्ये 12 हजार 605 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 7 हजार 934 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
पैदास रोखता येते, मात्र नियमितता हवी
कुत्र्यांची पैदास रोखता येणे शक्य आहे. मात्र, निर्बिजीकरणात नियमितता हवी आहे. बऱ्याच वेळा टेंडर घेण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. कुत्री पकडणे, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे यामध्ये मोठा धोका असतो. त्यामुळेच ही समस्या गंभीर बनत चालली आहे. तरीदेखील निश्चितच यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करून त्याला नियंत्रित करू, असे आश्वासन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिले आहे.









