अध्याय अठ्ठाविसावा
समोर दिसणाऱ्या विश्वातलं मिथ्यत्व उद्धवाला समजावून देताना भगवंत म्हणाले, ब्रह्म हे स्वयंप्रकाशित आहे. स्वत:च्या प्रकाशाने ब्रह्म कोणतेही कारण नसताना महाकारण होऊन प्रपंचाला प्रकाशमान करते. जगाचा आकार निर्माण होतो. माझ्याही सगुण रूपाचा भास होऊ लागतो. परंतु समोर दिसणारे जग खरे वाटत असले तरी नाश पावणारे आहे म्हणून ते मिथ्या आहे. मी तुला नाना युक्तीने वेदात काय सांगितलं आहे, विवेक कशाला म्हणतात, ब्रह्मऊपदेशाचे लक्षण कोणते, ज्ञान कोणते, अज्ञान कशाला म्हणतात हे सविस्तर सांगितले आहे. तसेच देह, इंद्रिये हे समोर दिसत असूनसुद्धा निरर्थक म्हणजे मिथ्या कशी आहेत, देहभाव आणि आत्मभाव ह्यात काय फरक आहे, केवळ ब्रह्म सत्य असून समोर दिसणारे विश्व मिथ्या कसे आहे हे सर्व गुह्य ज्ञान तुला दिले. मी दिलेले ज्ञान परिपूर्ण असून इतरांना ते सहजी मिळण्यासारखे नाही. चुकून कुणाला मिळालेच तरी समजण्यासारखे नाही. सिद्ध लोक ह्यातूनच समाधान पावतात. एव्हढेच नव्हे तर साधकांना साधना करण्यासाठी हेच ज्ञान प्रेरणा देत असते. तुला हे जे ब्रह्मज्ञान सांगितले ते उपदेशरुपी तीक्ष्ण शस्त्र आहे. ह्याचा उपयोग करून साधक संशय रहित होतात. काही लोक देहाभिमानामुळे ह्या ज्ञानावर संशय घेतात. त्या लोकांच्या देहाभिमानाचा ह्या शस्त्राने नाश होतो. संदेहाचा नाश झाल्यावर, द्वैताची बोळवण होते आणि सर्वत्र एकच ब्रह्म भरून राहिले असल्याची जाणीव होते. अशी जाणीव झाल्यावर मी तू पणाचे निर्दालन होऊन ते समूळ नष्ट होते आणि साधक स्वानंदात निमग्न होतो. साधकांच्या मनात वर्णाश्रम, कुळ, जाती ह्यामुळे किंवा जीवशिवादि पदस्थिती समजल्याने अहंकार निर्माण होत नाही. ह्यालाच उपरती असे म्हणतात. त्याला विषयभोगाविषयी बिलकुल प्रेम वाटत नसते. ह्याप्रमाणे कायमच कोणतीही अपेक्षा नसलेला साधक आत्माराम झालेला असतो. आता तू म्हणशील की, सर्वसामान्य माणसाला त्याच्या देहाचा कोण अभिमान असतो त्याप्रमाणे साधकही देहधारी असतो. मग देह आणि इंद्रिये शाबूत असताना त्याचा देहाभिमान कसा जात असेल? तर त्याबद्दल सविस्तर विवरण मी तुला सांगतो. ऐक, त्यासाठी देह आणि आत्म्यातला फरक समजून घ्यावा लागेल. माणसाचा देह किंवा इंद्रिये म्हणजे आत्मा नव्हे. देहाच्या हालचाली सुनियोजितपणे चालाव्यात म्हणून देहात इंद्रियांचा समावेश केलेला आहे. देवही देह आणि इंद्रिये धारण करतात. तेव्हा देव म्हणजेही आत्मा नव्हेत. त्यातच त्यांना अहंभाव असतो तेव्हा त्यांना आत्मपदी जागा कोठून मिळणार? देह वगळला तर प्राण उरतो पण तोही आत्मा नव्हे कारण तो एका देहातून दुसऱ्या देहात फिरत असतो. प्राण जर आत्मा असता तर तो देहाच्या आश्रयाने राहिला नसता. त्यामुळे प्राणाला कधी निजात्मता प्राप्त होत नाही. आत्मा म्हणजे पृथ्वी नव्हे कारण ती जड असते तसेच पाणी म्हणजे आत्मा नव्हे कारण तो द्रव पदार्थ आहे. अग्नी दाहक असल्याने त्याला आत्मा म्हणता येत नाही तसेच वायू चंचल असल्याने त्यालाही आत्मा म्हणता येत नाही. आकाश म्हणजे पोकळी होय. त्यामुळे त्यालाही आत्मा म्हणता येत नाही. मन नेहमीच निरनिराळे संकल्प करत असल्याने त्यातही आत्म्याचा वास नसतो. अंत:करणाला आत्मा म्हणता येत नाही कारण ते नाश पावणारे आहे तर चित्त चिंतन करणारे असल्याने त्याला आत्मा म्हणता येत नाही. माणसाला मी सर्व काही करत असतो असा अभिमान वाटत असतो त्या अभिमानाला काही आत्मा म्हणता येणार नाही कारण त्याला सुखदु:खाचे बंधन असते. बुद्धीला आत्मा म्हणता येणार नाही कारण तिला इतरांना शहाणपणा शिकवण्याची हौस असते. सत्व, रज, तम गुणांना आत्मा म्हणता येत नाही कारण गुण पूर्णपणे विकारी असतात. महतत्वही आत्मा नसते कारण त्यातून तर गुणाची निर्मिती होते. प्रकृतीत गुणांची साम्यावस्था असली तरी प्रकृती मिथ्या आहे.
क्रमश:








