अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा पुन्हा निर्वाणीचा इशारा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
गाझापट्टीतील दहशतवादी संघटना हमासने अमेरिकेची शांती योजना धुडकावली, तर या संघटनेचा पूर्ण नि:पात केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला आहे. गाझापट्टीतील संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेने 20 मुद्द्यांचा एक कार्यक्रम सादर केला आहे. इस्रायलने हा कार्यक्रम मान्य केला आहे. तथापि, हमासमध्ये तो स्वीकारण्यासंबंधात दोन तट पडल्याचे दिसून येत आहे. मात्र वरकरणी हमासने हा कार्यक्रम तत्वत: स्वीकारला असला तरी काही अटी समोर ठेवल्या आहेत. तसेच काही मुद्द्यांवर अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हमासने अमेरिकेची योजना स्वीकारली नाही, तर अमेरिका इस्रायलला हमासला नष्ट करण्याची पूर्ण मुभा देईल. त्यानंतर या संघटनेला कोणीही वाचवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. या कालावधीला आता केवळ काही तास उरले आहेत. तथापि, हमासने अद्यापही ही योजना पूर्ण स्वीकारल्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे पेच कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढचा एक दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
महत्वाची योजना
अमेरिका अणि इस्रायल यांनी मिळून ही योजना सज्ज केली आहे. या योजनेनुसार इस्रायलने प्रथम गाझापट्टीवरील हल्ले थांबवायचे आहेत. त्यानंतर चोवीस तासांमध्ये हमासने ही योजना मान्य करायची आहे. नंतर 72 तासांमध्ये हमासने इस्रायलच्या सर्व अपहृतांची सुटका करायची आहे. तसेच जे अपहृत हमासच्या ताब्यात असताना मृत झालेले आहेत, त्यांचे मृतदेहही इस्रायलला सुपूर्द करायचे आहेत. इस्रायलनेही त्वरित हमासचे सर्व कैदी आणि ओलीस सोडायचे आहेत. नंतर इस्रायलने टप्प्याटप्पाने आपले सैनिक गाझापट्टीतून मागे घ्यायचे आहेत. त्यानंतर, गाझापट्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय उच्चशिक्षितांची समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्षस्थान ट्रम्प यांच्याकडे असेल. तर ब्रिटनचे माजी नेते टोनी ब्लेअर हे या समितीचे कार्यकारी अधिकारी असतील. अशा प्रकारे शांतता प्रस्थापित करण्याची ही योजना आहे.









