पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांची धमकी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. तरीही पाकिस्तानच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यास शस्त्रसंधी धोक्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सिंधू जल करारावरून तोडगा न निघाल्यास शस्त्रसंधी धोक्यात येऊ शकते. हा विषय निकाली न निघाल्यास याला ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाईल. भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या पुढील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. जम्मू-काश्मीरचा मुद्दा क्षेत्रीय शांततेसाठी महत्त्वपूर्ण आहे. जर काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर मग स्थायी शांतता अवघड आहे, असे डार यांनी म्हटले आहे.
पाकिस्ताने कधीच भारताच्या विरोधात अण्वस्त्रs तैनात करण्याचा विचार केलेला नाही. अनेकदा गंभीर स्थिती निर्माण होते, ज्यात काही निर्णय घ्यावे लागतात. परंतु आम्ही अण्वस्त्रs तैनात न करताही तणावाला सामोरे जाण्यास सक्षम आहोत असा दावा डार यांनी केला आहे.
सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानला बोचत असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. पाकिस्तानात पंजाबपासून सिंधपर्यंत सिंधू नदीचे पाणी सिंचनापासून पेयजलासाठी महत्त्वपूर्ण आहे. सध्या भारताने सिंधू जल करार रोखण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने ज्याप्रकारे जलविद्युत प्रकल्प निर्मितीला वेग देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, ते पाहता पाकिस्तानची धास्ती वाढली आहे. भारत सिंधू नदीचे पाणी वळविण्यास यशस्वी ठरला तर मोठे संकट उभे राहिल असे पाकिस्तानला वाटत आहे. याचमुळे पाकिस्तान आता धमकी देऊ लागला आहे.









