माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली : केंद्र सरकारच्या धोरणावर हल्लाबोल
बेळगाव : प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणामध्ये कोणाचे पात्र आहे हे महत्त्वाचे नाही, तर अभिनय महत्त्वाचा आहे. हे प्रकरण कर्नाटकातील राजकारण्यांना शरमेने मान खाली घालावयास लावणारे आहे. यासाठी संपूर्ण देवेगौडा कुटुंबाने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी करून केंद्र सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. लोकसभेची ही निवडणूक देशातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान झाले तर लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, सर्व निवडणुका एकदाच घेतल्या जातील. एक देश एक निवडणूक प्रक्रिया अवलंबिली जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या तंत्रज्ञान पुढारले असतानाही तीन महिने निवडणूक प्रक्रिया राबविण्याची काय गरज आहे? ही केवळ प्रचारासाठी केलेली सोय आहे. कन्याकुमारीपासून ते देशातील सर्व भागात निवडणूक प्रचार करण्याची सोय आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात लष्करी राजवट आणण्याची तयारी सुरू आहे. भाजपच्या घोषणापत्रात मोदी गॅरंटी असे नमूद करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत बदल करण्याची तयारी सुरू आहे.
त्यांनी निजदबरोबर हातमिळवणी केलेली विसरल्याचे दिसून येते. निवडणूक बॉन्डमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याबाबत केंद्राकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. केंद्रामध्ये युपीए सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले होते. मात्र, नरेंद्र मोदी सरकारकडून एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यात आलेले नाही. हे जनतेसाठी अत्यंत वाईट दिवस आहेत. मात्र मोदी यांच्यासाठी चांगले आहेत, असे त्यांनी सांगितले. एनडीएचे हासन येथील उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडीओमुळे संपूर्ण कर्नाटकाला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. यामुळे कर्नाटकाच्या राजकारणाचे नाव बदनाम झाले आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देश सोडतो, असे सांगितले होते. आता त्यांच्या बाजूला बसून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील एनडीए उमेदवार जगदीश शेट्टर विश्वासघातकी आहेत. महिला खासदारांना बाजूला करून त्यांनी सत्तेसाठी तिकीट मिळविले आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार राजू सेठ, नागराज यादव, माजी मंत्री अभयचंद्र जैन, विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.









