केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. चंद्रशेखर यांचे प्रतिपादन : मडगावातील लोहिया मैदानावर क्रांतिदिन सोहळा उत्साहात
मडगाव : 18 जून क्रांतिदिन हा गोव्यासाठी खूप महत्त्वाचा असून दबलेला स्वातंत्र्यवाद या दिवशी उफाळून आला. काँग्रेसने त्यावेळी गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यास विलंब लावला. त्यानंतर डॉ. राम मनोहर लोहियांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सूत्रे हातात घेतली. सरदार वल्लभभाई पटेल हयात असते, तर गोव्याला आणखी लवकर मुक्ती मिळाली असती, असे उद्गार केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. राजीव चंद्रशेखर यांनी काढले. मडगावातील लोहिया मैदानावर रविवारी झालेल्या क्रांतिदिन सोहळ्यात ते बोलत होते. गोव्यातील क्रांतीपासून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यालाही प्रेरणा मिळाल्याचे चंद्रशेखर पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’चे आश्वासन दिले असून या क्रांतिदिनी आम्ही गोवा राज्य अधिक सक्षम व विकसित करण्यासाठी पुन्हा समर्पित होऊया, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, साबांखा मंत्री नीलेश काब्राल, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, डॉ. राम मनोहर लोहिया यांचे पुत्र डॉ. रमेशचंद्र लोहिया आणि परिवार, स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, जिल्हाधिकारी अश्विन चंद्रो तसेच पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया व्यासपीठांवर उपस्थित होते. पिंटोचे बंड, कुंकळ्ळीचे बंड तसेच दिपाजी राणे यांचे बंड हे दिन सरकारने ऐतिहासिक दिवस म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. कुंकळ्ळीचे बंड 15 जुलै या दिवशी राष्ट्रीय स्मारक, दिल्ली येथे दरवर्षी साजरे करण्यात येईल. गेल्या वर्षापासून त्याला प्रारंभ झाला आहे. यंदा खासदार विनय तेंडुलकर 15 जुलै रोजी दिल्लीत मानवंदना देणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व स्मारकांचे सुशोभिकरण
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अंतर्गत स्वातंत्र्यलढ्याला समर्पित सर्व स्मारकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पत्रादेवी येथील स्मारकाचे सुशोभिकरण वर्षभरात पूर्ण होईल. पिंटोंच्या स्मारकाचे सुशोभिकरण पूर्ण झाले आहे, तर दिपाजी राणे यांच्या स्मारकाचे काम हाती घेतले जाणार आहे. इतिहास विसरू शकत नाही आणि तो विसरू नये. यासाठी विद्यार्थी आणि इतर लोकांमध्ये तो सातत्याने राहावा यासाठी सरकारचे सदोदित प्रयत्न राहणारत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांहस्ते डॉ. रमेशचंद्र लोहिया यांचा शाल, स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यसैनिक गुरुदास कुंदे, रोहिदास देसाई, विष्णू आंगले, वामन प्रभुगावकर यांचेही सत्कार करण्यात आले. ‘दि स्ट्रगल फॉर सिव्हिल लिबरटीज’ या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाचे मुख्यमंत्र्यांहस्ते प्रकाशन करण्यात आले.









