पुणे / प्रतिनिधी :
विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. बारसू प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल, तर या प्रकल्पाचा जरूर फेरविचार करावा. मात्र, पर्यावरण व पर्यटन व्यवसायाचे नुकसान न होता फायदा होणार असेल, तर प्रकल्पास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना समजावून सांगावे. त्यांचे समज गैरसमज दूर करावेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.
रत्नागिरीतील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावर राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात मतप्रदर्शन केले. पवार म्हणाले, विकासाला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र, कोणत्याही भागात विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, ही खबरदारी आपण घेतली आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी कालच बोललो. तेथील लोकांना कोणत्याही कारणासाठी विरोध आहे. ते पहा, असे मी त्यांना सांगितले. समृद्ध महामार्गाच्या वेळी जागेचा योग्य मोबदला द्यावा, यासाठी सुरुवातीला लोकांनी विरोध केला होता. मात्र, लोकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर विरोध मावळला होता. आता बारसूमध्ये कातळ आहे. असे असताना मग तेथे विरोध कशासाठी आहे? मोबदल्यासाठी आहे की मत्स्यव्यवसाय अडचणी येऊ शकतो म्हणून आहे? का रोजगाराची खात्री हवी वा पर्यावरणासाठी आहे, हे तपासले पाहिजे.
एन्रॉनलाही सुरुवातीला विरोध होता. आधी हा प्रकल्प रद्द झाला. नंतर हा प्रकल्प पुन्हा साकारला. हे आपण पाहिले आहे. भावी पिढी बरबाद होणार असेल, तर प्रकल्पाला विरोध होणे योग्यच होय. मात्र, आर्थिक सुबत्ता येणार असेल, फायदा होणार असेल, तर तीही बाजू ध्यानात घेतली पाहिजे. स्थानिक आमदार राजन साळवी यांचे विधान मी स्वत: ऐकले आहे. ते त्या भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांचे म्हणणे आपला पाठिंबा आहे. माझी भूमिका हीच आहे, की पर्यावरणाचे नुकसान होणार नसेल, पर्यटनावर परिणाम होणार नसेल, तर जे विरोध करीत आहेत, त्यांना समजावून सांगावे. समज गैरसमज दूर करावेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो. दुष्परिणाम होणार नसतील. फळांवर, शेतीवर परिणाम होणार नसेल नि रोजगार उपलब्ध होणार असतील, तर याबाबत विचार करावा.
ती उद्धव ठाकरेंची भूमिका
शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत पहिल्यांदा पत्र दिले आहे. आता उद्धव ठाकरेंनी आपण जनतेच्या सोबत आहे, असे म्हटले आहे. प्रकल्पाला जनतेचा विरोध असल्याने आपण विरोध करत असल्याची भूमिका ठाकरे यांची आहे. ही त्यांची भूमिका आहे, असे सांगत आज प्रचंड महागाई आणि बेरोजगारी आहे. अशावेळेस काही प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर गेलेले आपण पाहिले. ज्यातून काही लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळणार होता. आता यातून रोजगार मिळून तिथे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नसतील, तर विचार करायला हवा.
विरोध करणाऱयांचे समज-गैरसमज दूर करावेत
उदय सामंत यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्या भागातील एकही घर उठवले जाणार नाही. एकही गाव उठवले जात नाही. तिथे कुणाचे घर-गाव उठवले जात नाही. मग आता प्रश्न आला, की ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. याबद्दल अशाही बातम्या ऐकायला मिळत आहेत की, परराज्यातील लोकांनी तिथे जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. याबद्दल शहानिशा करावी. स्थानिकांना फायदा होणार असेल, तर त्याही बाजूने विचार केला पाहिजे. त्या भागातील जनजीवन, मासेमारी किंवा पर्यटन या सगळय़ावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसेल, तर जे विरोध करतात त्यांना विश्वासात घ्यावे. याबाबत संवेदनशीलता सरकारने दाखवावी, असे आवाहनही पवार यांनी केले.
बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नसते
माझे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर अजिबात लावण्यात येऊ नये, असे सांगत सासुरवाडीमध्ये माझ्यावर प्रेम ऊतू चालल्याने असे होत असावे. हा अतिशय चुकीचा आग्रह आहे. याच्यातून काही होणार नाही. जेवढे जास्त आमदार तुमच्या विचाराचे निवडून येतील आणि जर वरिष्ठांनी आशीर्वाद दिले आणि आमदारांनी तुमचे सिलेक्शन केले, तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता, असे त्यांनी सांगितले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील जास्त योग्य आणि उत्तम मुख्यमंत्री वाटत असावेत. प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रियाही पवार यांनी व्यक्त केली.








