प्रतिनिधी/ बेळगाव
गावात कचरा वेचण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या दोन महिलांना सौंदत्ती पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याजवळून सुमारे 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिने व रोकड जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी भर दिवसा बेटसूर (ता. सौंदत्ती) येथील गुराप्पा बसाप्पा अळगोडी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या, चांदीचे दागिने पळविले होते. कचरा वेचण्याच्या बहाण्याने गावात आलेल्या दोन महिलांनी हे कृत्य केले आहे.
सखुबाई महादेव शिकल्लगार (वय 40, रा. जमखंडी), लालव्वा लक्ष्मण शिकल्लगार (वय 30, रा. मुधोळ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौदत्तीचे पोलीस निरीक्षक करुणेशगौडा जे., उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, के. एम. कल्लूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली असून चुळकी, बेटसूर, चिक्कउळ्ळीगेरी परिसरात त्यांनी घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याजवळून 60 ग्रॅम सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम चांदीच्या मूर्ती, 50 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.









