वार्ताहर/मजगाव
मजगावातील पश्चिमेकडील शेतवडीतील भाजीपाला पिकविणाऱ्या तीन शेतकऱ्यांच्या विहिरीतील तीन पंपसेट्सच्या मोटारी व पाईप कापून अज्ञातांनी बुधवारी रात्री लंपास केल्याने लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी केली. सदर चोरट्यांनी विहिरीवरील मीटर बॉक्सची मोडतोड करून विद्युत पुरवठा बंद करून विहिरीतील मोटारी बाहेर काढून पंपसेट्सच्या पाईप कापून विहिरीत टाकल्या व तीन पंपसेट्स लंपास केले आहेत. यासाठी बहुतेक रिक्षा किंवा चारचाकी वाहनाचा वापर केला असेल असे दिसून येत होते. मिथुन यल्लाप्पा हितलमणी (रा. मारुती गल्ली, मजगाव) यांचा 3 एचपी पंपसेट, रवी भरमा हित्तलमनी (रा. मारुती गल्ली, मजगाव) यांचा 3 एचपी पंपसेट, सुरेंद्र बेळगावकर (रा. तानाजी गल्ली, मजगाव) यांचा 5 एचपी पंपसेट चोरीस गेला आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी उद्यमबाग पोलिसांत तक्रार केली आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या बोअरवेल आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन वर्षांपूर्वीही या परिसरातील दहा पंपसेट चोरीस गेले होते.









