पुणे / वार्ताहर :
पुण्यातील खडकी बाजार परिसरात चोरटय़ांनी चप्पलचे गोडाऊन फोडून 30 हजार रुपये किंमतीच्या चपला चोरुन नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केल्याची माहिती सोमवारी दिली.
सागर दत्ता चांदणे (वय 23), आकाश विक्रम कपूर (22) व अरबाज जाफर शेख (21, तिघे रा. खडकी, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हरेश श्रीचंद अहुजा (वय 38, रा. पिंपरी, पुणे) यांनी खडकी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हरेश अहुजा यांचे खडकी बाजार येथे चप्पलचे गोडाऊन आहे. 19 मे रोजी रात्री नऊ ते 20 मे सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान हे गोडाऊन फोडून अज्ञातांनी 30 हजार रुपये किंमतीचे एकूण 40 जोडे मेन्स शुज व 15 जोडे लेडीज चप्पल असा मला चोरी करुन नेला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस भांडवलकर पुढील तपास करत आहेत.









