अयोध्यानगरमध्ये वीज घालवून चोरीचा प्रकार
बेळगाव : अयोध्यानगर येथील एका घरासमोरून चंदनाच्या झाडाची चोरी करण्यात आली आहे. बुधवारी चोरीची ही घटना उघडकीस आली असून वनविभाग व पोलीस खात्याकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीने मध्यरात्री हे कृत्य केले आहे. अयोध्यानगर येथील विजया हॉस्पिटलजवळच असलेल्या एका घरासमोर गेल्या 20 वर्षांपासून चंदनाचे झाड होते. त्याचा बुंधा मोठा झाला होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर 3 ते 3.15 पर्यंत या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचवेळी कटरने कापून झाड पळविण्यात आले आहे. चंदनाचा बुंधा कापून नेताना तीन ते चार जणांची छबी परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. झाड कापण्याच्या आवाजामुळे घरमालकांच्या मुलाला जाग आली. त्याने दरवाजा उघडला. चोरट्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक करीत चंदनासह चोरट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेने खळबळ माजली आहे.









