बंद घरातील रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने लांबविले
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील मठ गल्ली, गोजगे रोडवरील एका बंद घराची मागील दरवाज्याची कडी काढून चोरांनी दिवसाढवळ्या धाडसी चोरी केली आहे. यामध्ये सोने आणि रोख रक्कम अशी एकूण पाच लाखाची चोरी झाल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमाराला घडली आहे. या परिसरात चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराला कुलूप लावून बाहेर जावे की नाही, हा मोठा यक्षप्रश्न सर्वांसमोर आता उभा ठाकला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी उचगाव मठ गल्लीतील रहिवासी रघुनाथ लाळके हे पत्नीसह सकाळी घराला कुलूप लावून शेताला गेले होते. दुपारी जेवणासाठी घरी येऊन पाहतात तर घराचा मागील दरवाजा आणि तिजोरी फोडल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांच्या घराच्या मागील बाजूने शेतवडीत जाणारा रस्ता असून मागील बाजूलाच कृषी खात्याचे कार्यालय आहे. कृषी कार्यालयामध्ये अनेकवेळा लोकांची ये-जा असते. यामुळे जवळपासच्या नागरिकांना कोणताही संशय आला नाही.
यावेळी एका दुचाकीवरून तीन युवक आल्याचे समजते. यातील एक युवक मागील रस्त्यावर फेऱ्या मारत असल्याचे सांगण्यात आले. तर दोन युवक लाळके यांच्या परसातून जाऊन खिडकीचा दरवाजा उघडून मुख्य दरवाजाची कडी काढण्यात त्यांनी यश मिळविले. दोघांनी तिजोरी कटावनीने फोडून तिजोरीतील तीन लाख रुपये तसेच दीड तोळ्याची सोन्याची चेन व इतर चांदी अशी एकूण पाच लाखांची धाडसी चोरी केली आहे. रघुनाथ लाळके यांनी अलीकडेच भात व बटाटे यांची विक्री केली होती. याचबरोबर ते विद्युत मोटारी दुरुस्तीचे काम करत असतात. यातून त्यांनी हा पैसा जमा केला होता. सदर रक्कम ही देण्यासाठी त्यांनी ठेवली होती. तसेच बुधवारी सकाळीच बँकेमधूनही त्यांनी 50 हजार रुपये काढून तिजोरीत ठेवले होते. ही सर्व रक्कम त्यांना दोन दिवसांत द्यावयाची होती. मात्र ऐनवेळी चोरांनी यावर डल्ला मारला आणि सगळी रक्कम लांबविल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
दोन वेळा एकाच घरात चोरी
मागील वर्षीही रघुनाथ लाळके यांच्याच घरी अशाच प्रकारे चोरी करण्यात आली होती. त्यावेळीही सव्वा चार तोळे सोने, चांदी आणि काही रक्कम चोरांनी लांबविली होती. सलग दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या चोरीमुळे लाळके कुटुंबीय हाताश झाले आहे. घराच्या मागील बाजूने रस्त्यावरून एक व्यक्ती फेऱ्या मारत असल्याचे काही जणांनी पाहिले होते. मात्र कृषी खात्याचे कार्यालय असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि हा चोरीचा मोठा प्रकार घडला. या घटनेची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलीस खातेच सुस्तावले का?
उचगाव परिसरात सातत्याने चोरीचे सत्र सुरूच असल्याने या भागात नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात आठाड्याभरात अनेक चोऱ्या झाल्या मात्र एकाही चोरीचा अद्याप तपास लागला नाही. त्यामुळे पोलीस खाते सुस्तावले आहे का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. सर्व चोऱ्यांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली असून त्याचे पंचनामेही करण्यात आले आहेत. मात्र तपास गतीने होताना दिसत नाही. पोलीस खाते याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे या भागातील जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशाच चोऱ्या सातत्याने होत राहिल्या आणि याचा तपास वेळेत लागला नाही तर जनतेने दाद कोणाकडे मागायची, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.









