प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात चोरीचा प्रकार घडला आहे. पंधरा दिवसांपूर्वी सुमारे 10 लाखांची मशिनरी चोरण्यात आली असून बुधवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरी प्रकरणाचा तपास करण्याऐवजी माहिती लपविण्यात धन्यता मानली आहे.
उपलब्ध माहितीनुसार ट्रेसीथर्म फॅक्टरी इंजिनिअर्स या कारखान्यात चोरीचा प्रकार घडला आहे. दि. 15 ते 17 जुलै यावेळेत ही घटना घडली आहे. अन्यत्र हलविण्यासाठी मशिनरी खोलण्यात आली होती. चोरट्यांनी सुमारे 10 लाखांची मशिनरी चोरल्याची फिर्याद वैभव यादव यांनी दिली आहे.
बेळगाव शहर व उपनगरांप्रमाणेच औद्योगिक वसाहतीतही चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याऐवजी पोलीस अधिकारी चोरीच्या घटनांवर पांघरुण घालून त्याची माहिती माध्यमांना मिळू नये, याची दक्षता घेत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.









