चार महिला-पुरुष साथीदाराचा समावेश : 4 लाखाच्या साड्या पळविल्या
बेळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्या गर्दीचा फायदा घेत गुन्हेगारही सक्रिय झाले असून एका कापड दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून चार लाखांहून अधिक किमतीच्या रेशमी साड्या पळविण्यात आल्या आहेत. शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी खडेबाजार येथील एका कापड दुकानात ही घटना घडली असून खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या पाच ते सहा महिला व त्यांच्यासोबत आलेल्या एका पुरुषाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी खडेबाजार पोलिसांना माहिती देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शुक्रवारी दुपारी साड्या खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या पाच ते सहा महिला व त्यांच्या एका पुरुष साथीदाराने दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून महागड्या रेशमी साड्या पळविल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध घेण्यात येत असून पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. 22 ऑक्टोबर रोजी देशपांडे गल्ली येथील शगुन ट्रेडर्स या सुकामेव्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या दोन महिला व एका युवकाने कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील 50 हजार रुपये पळविले होते. या घटनेनंतर केवळ काही तासांतच इराणमधील दोन महिला व दोन पुरुष अशा चौघा जणांना अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी खडेबाजार येथील कापड दुकानातील किमती साड्या पळविण्यात आल्या आहेत.









