हिरेबागेवाडी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. कुबेर ढाब्याजवळील पान दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच येथून जवळच असलेल्या एका नव्या कारखान्याच्या कार्यस्थळावर चोरीची घटना घडली आहे. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रवीण बेल्लद यांच्या नव्या कारखान्याच्या कार्यस्थळावरून चार लाखंडी पाईप, डिझेल कॅन, पाने आदी सुमारे 50 हजारहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. प्रवीण यांच्या जमिनीवर एका कंपनीचे काम सुरू आहे. त्या कार्यस्थळावरून साहित्य पळविण्यात आले आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कामगार दाखल झाले. त्यावेळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. हिरेबागेवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. हलगा, बस्तवाड परिसरात पान दुकान, किराणा दुकान, फूड स्टॉल फोडण्याबरोबरच रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्याचे प्रकारही वाढले आहेत. या परिसरातील घटनांकडे हिरेबागेवाडी पोलिसांचे साफ दुर्लक्ष झाले असून गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.









