संगमेश्वर, वार्ताहर
Ratnagiri News : संगमेश्वर कसबा-शास्त्रीपूल येथील डी.के.बॅटरी सर्व्हिस दुकान मागच्या बाजूने फोडून त्यातील 22 बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. या बॅटऱ्यांची किंमत सुमारे 60 हजार रुपये असून, बॅटऱ्या चोरीप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात सुरेंद्र सुरेश डिके (रा. तुरळ डिकेवाडी) यांनी फिर्याद दिली.
संगमेश्वर-कसबा शास्त्रीपूल येथे डी.के.बॅटरी सर्व्हिस नावाचे चारचाकी व दुचाकी वाहनांचे बॅटरी खरेदी-विक्रीचे दुकान आहे. 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूस भिंतीतील सिमेंट लोखंडी खिडकी कोणत्यातरी साधनाने उचकटवून काढली व त्या वाटे दुकानात प्रवेश केला होता. यावेळी आतील चारचाकी व दुचाकीच्या सुमारे 60 हजार किंमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या, अशी फिर्याद दिली होती.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत होते. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत प्रसाद विलास साळवी (25, रा. परटवणे, रत्नागिरी) याला अटक केली. त्याच्याकडून काही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बॅटऱ्या चोरीप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. या प्रकरणी आणखी काही आरोपी सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत शिंदे करत आहेत.









