11 जनावरांच्या चोऱ्यांमुळे पशुपालक भीतीच्या छायेत
बेळगाव :
चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ बेळगाव शहर व उपनगरात जनावरे चोरण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. हुदली (ता. बेळगाव) येथे चरायला सोडलेल्या सुमारे 50 हजार रुपये किमतीच्या सहा शेळ्या चोरल्याची घटना ताजी असतानाच यरमाळ रोड, वडगाव येथील एका गोठ्यात बांधलेली बैलजोडी चोरण्यात आली आहे. शनिवार दि. 17 मे रोजी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. बसवाण गल्ली, शहापूर येथील मधु बाळकृष्ण मासेकर यांची यरमाळ रोड, वडगाव येथे शेतजमीन आहे. तेथेच जनावरांचा गोठाही आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ते आपल्या शेतात गेले. त्यावेळी गोठ्यातील बैलजोडी चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊन बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. जनावरे चोरण्याचे प्रकार वाढल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









