पर्रा, म्हापसा गणेशपुरी येथील घटना, पोलीस गस्त योग्यरित्या नसल्याने चोरी : मायकल लोबो
म्हापसा : चोरट्यांनी आपला मोर्चा सध्या म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत वळविला असून लिंगभाट पर्रा येथे महादेवाच्या मंदिरात, गणेशपुरी म्हापसा येथे दोन बंगल्यात प्रवेश करून रोकड पळविली. या तीन चोऱ्यामुळे म्हापसा पोलीस खडबडून जागे झाले असून पोलीस निरीक्षक सिताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयबी पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत. पर्रा मंदिरातील चोरीसाठी मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी लहान मुलाचा वापर झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलीस गस्त योग्यरित्या होत नसल्याने या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप आमदार मायकल लोबो यांनी केला. लिंगाभाट, पर्रा येथील श्री नागनाथ महादेव देवस्थानच्या मंदिरातील फंडपेटी फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. या फंडपेटीत 70 हजार ऊपये असावेत, असा अंदाज आहे. चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आतमध्ये प्रवेश करून त्यांनी फंडपेटी फोडली. या चोरीमध्ये तीन चोरट्यांचा समावेश आहे. तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांनी रेनकोट व तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
यापूर्वीही मंदिरात चोरी : रमाकांत नाईक
ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. नंतर म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यापूर्वीही मंदिरात अशीच घटना घडली होती. पण कोणतीही वस्तू चोरीस गेली नव्हती. यावेळी मात्र फंडपेटीतील पूर्ण रक्कमच चोरट्यांनी पळवली आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष रमाकांत नाईक यांनी पत्रकारांना दिली.
पोलिसांनी गस्त बंद केल्याने चोऱ्या वाढल्या : लोबो
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर आमदार मायकल लोबो यांनी घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा घटना अतिशय दुख:द आहेत. या मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाली. रात्रीच्यावेळी या परिसरात पोलीस गस्त वाढवावी. पोलिसांना गस्त घालण्यासाठी मोटरसायकल दिल्या होत्या. ते प्रत्येक मंदिर-चर्चकडे फेरी मारून गस्त घालत होते. पण सध्या ते बंद झाले आहे. राज्यातील मंदिरे, कपेल आणि चर्च सुरक्षित असणे गरजेचे आहे, असे लोबो म्हणाले.
म्हापसा गणेशपुरीत घरात चोरी
म्हापसा गणेशपुरी गृहनिर्माण वसाहतीमध्ये राहणाऱ्या डॉ. स्वाती संदीप दिवकर व त्यांच्या बाजूला राहणाऱ्या उमेश जोशी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील रोकड पळविली. डॉ. स्वाती दिवकर आपल्या डिसपेन्सरीमध्ये गेल्या होत्या. त्या दुपारी घरी आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. घरातील दोन कपाटातील रोख 10 हजार ऊपये चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती डॉ. दिवकर यांनी दिली. दरम्यान येथे बाजूला राहणारे उमेश जोशी म्हणाले, आम्ही घरात कुणीही नव्हतो. दुपारी आपण घरी आलो असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. पितळीची लॅच चोरट्यांनी तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरात सर्वत्र चोरट्यांनी पाहणी केली व तेथून ते पसार झाले. त्यांचा चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापसा पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी फौजफआट्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या वॉर्डाच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. येथील एक नागरिक सुशांत सखाराम गावकर यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. 2020 साली अशाच प्रकारे आपल्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला होता अशी माहिती जोशी यांनी दिली. चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागले नसले तरी ऐन पावसाळ्यात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.









