खादरवाडीत 25 हजार रोख रकमेसह 2 तोळे सोने लंपास
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी भरदुपारी खादरवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. धरणाजवळ असलेल्या भूपेश मधुकर परब यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शुक्रवारी दुपारी 2 वाजता चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे फुटेजवरून लक्षात येते. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्याने पाठीमागच्या दरवाजातून प्रवेश करून 25 हजार रुपये रोख रक्कम, 2 तोळे सोने पळविले आहे. यासंबंधी शुक्रवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









