बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. बुधवारी सकाळी मार्केट यार्डमधील दोन अडत दुकानांमध्ये घुसून भरदिवसा ड्रॉवरमधील रोकड पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मार्केट यार्ड परिसरात अडत दुकानात घुसून रोकड पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी सकाळी 9.30 ते 10 यावेळेत दोन दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. मार्केट यार्डमधील ज्योतिर्लिंग ट्रेडर्स या दुकानातील ड्रॉवर स्क्रू ड्रायव्हरने फोडून ड्रॉवरमधील सुमारे 30 हजारहून अधिक रोकड पळविण्यात आली आहे. तर श्री एंटरप्रायझेस या दुकानातून 5 हजार रुपये पळविण्यात आले.
चोरीसाठी आलेल्या दोघा जणांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. एकटा रक्कम पळवत होता तर दुसरा दुकानाबाहेर थांबून टेहळणी करीत होता. बुधवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे मार्केट यार्डमध्ये गर्दी होती. अडत दुकानदार लिलावात मग्न होते. हीच संधी साधून चोरट्यांनी ड्रॉवर फोडले असून ग्राहकासारखे वावरत दुकानात शिरून रोकड पळविणाऱ्या दोघा अज्ञातांचा शोध घेण्यात येत आहे.









