सोन्या-चांदीचे दागिने लांबविले ः चोरटे सीसीटीव्हीत कैद ः पोलिसांकडून तपास सुरू
प्रतिनिधी/ संकेश्वर
हुक्केरी तालुक्यातील शेंडूर आणि शिप्पूर येथील मंदिरांमध्ये चोरी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच संकेश्वर शहरातील मड्डी गल्लीत असणाऱया श्री यल्लम्मा मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान मंदिरांसह बंद घरांमध्ये चोरीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, मंदिरात असणाऱया सीसी कॅमेऱयात मध्यरात्री 1.30 च्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मंदिराच्या मागील बाजूने लोखंडी सळीने खिडकीतून अलगतपणे किरीट व मंगळसूत्र काढून घेत तेथून पोबारा केला. याठिकाणी बेंटेक्सचेही दागिने होते, पण ते चोरटय़ांनी लांबविले नसल्याने चोरटे माहितीगार असावेत, असा कयास व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ राजकीय नेते आप्पासाहेब शिरकोळी, डॉ. नंदकुमार हावळ, पाटील आदींनी मंदिराला भेट देऊन चोरी प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली. सदर घटनेत 12 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला आहे. मंदिरात असणाऱया सीसीटीव्ही कॅमेऱयातील फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.









