दानपेटी तोडून रक्कम लंपास : भाविकांतून संताप
वार्ताहर/कणकुंबी
चिखले येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झालेल्या श्री सातेरी केळबाय देवी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दान पेटीतील रक्कम लंपास केली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन अथक परिश्रमाने हे मंदिर उभारले होते. सदर घटनेमुळे श्री सातेरी केळबाय देवी आणि श्री राम प्रभू यांच्या भक्तांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्री चोरांनी मंदिराच्या समोरील दरवाजाचे असलेले कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरात असलेली दानपेटी तोडून त्यातील रक्कम लंपास केली. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चोरांनी प्रवेश केला नाही. सदर घटना शुक्रवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर घटनेची माहिती जांबोटी येथील पोलीस चौकीला कळविण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कणकुंबी भागातील मंदिरात अशा अनेक चोरीच्या घटना घडत असून, त्यामुळे गावातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी लवकरच या चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. की त्यांनी अधिक सतर्क रहावे आणि अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. मागील महिन्यात चिगुळे येथील श्री माउलीदेवी मंदिरात देखील चोरीची घटना घडली होती. त्यानंतर कणकुंबी भागातील अन्य एका मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता.









