दोन लाख रुपयांसह 9 तोळे सोन्याचे दागिने लंपास
खानापूर : रामगुरवाडी ता. खानापूर येथील घर बंद असलेले पाहून चोरट्यानी मागील दरवाजा तोडून घरातील रोख दोन लाख रुपये आणि 9 तोळे सोन्याचे दागिने असा साडेसहा लाखांचा ऐवज लांबविला असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी, रामगुरवाडी येथील रहिवासी गणपती नानाजी गुरव यांच्या घरातील लोक बाहेर गेले होते. घर बंद असलेले पाहून चोरट्यांनी संधी साधून मागील दरवाज्याची आतून लावलेली कडी तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या दोन तिजोऱ्या फेडून त्यामधील रोख दोन लाख रुपये आणि नऊ तोळे सोने लांबविले आहे. जेव्हा गणपती गुरव घरी आले. आणि त्यांनी समोरील दरवाज्याचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शेजारच्या लोकांना माहिती दिली आणि खानापूर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. श्वानपथक जवळपासच घुटमळत राहिले. ठसे तज्ञांनी कपाटावरील आणि इतर ठिकाणचे ठसे घेतले आहेत. गणपती गुरव यांची दोन्ही मुले व्यवसायानिमित्त कोल्हापूरला असतात. प्लॉट खरेदी करण्यासाठी रोख रक्कम त्यांनी घरी आणून ठेवली होती. येत्या काही दिवसात ते प्लॉट खरेदी करणार होते. मात्र हीच रक्कम लांबविल्याने गुरव कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.









