10 लाखांचे दागिने लंपास : परगावी गेल्याने घर होते बंद
बेळगाव : बेडरूमच्या खिडकीचे अॅल्युमिनियमचे ग्रिल तोडून सुमारे 10 लाखांचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. मंगळवार दि. 20 मे रोजी सकाळी लष्करी वसतीगृहात ही घटना उघडकीस आली असून प्रशिक्षणासाठी गेलेल्या मेजरच्या घरी झालेल्या चोरीमुळे खळबळ माजली आहे. कॅम्प येथील लष्करी वसाहतीत ही घटना घडली आहे. चोरट्यांनी एका मेजरचे घर फोडले असून शंभर ग्रॅम सोने, प्लॅटिनम व हिऱ्यांचे दागिने, 10 ग्रॅम चांदी, मोत्यांचे हार असा 10 लाख 7 हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. मेजर अभिषेक हे प्रशिक्षणासाठी मध्यप्रदेशला आपल्या घराला कुलूप लावून गेले आहेत. मंगळवारी सकाळी 10 वा. त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. बेडरूमच्या खिडकीला असलेली अॅल्युमिनियमची तार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला असून कपाटातील शंभर ग्रॅम सोने व दहा ग्रॅम चांदीचे दागिने पळविले आहेत.घटनेची माहिती समजताच कॅम्पचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लष्करी वसतीगृहात चोरी करणारे चोरटे कोण? याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.









