चौकट-दरवाजाचे 5 किलो चांदीचे कवच लांबविले
कारवार : कारवार जिल्ह्यातील हल्ल्याळ येथील श्री महागणपती देवस्थानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी मंदिरातील चौकट आणि दरवाजाचे चांदीचे सुमारे 5 किलो वजनाचे कवच लांबविले आहे. लांबविण्यात आलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सुमारे सव्वालाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. हे देवस्थान हल्ल्याळ येथील नवीन बसस्थानकापासून आणि पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर आहे. हे देवस्थान हल्याळ येथील वनश्री सर्कल आणि कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल दरम्यान बेळगाव-हल्ल्याळ रस्त्यावर असूनही चोरीचा थांगपता कुणाला लागू शकला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्ल्याळ पोलिसांनी चोरी झालेल्या मंदिराला भेट देऊन पाहणी केली.









